पुणे

Pune News : सणासुदीत नागरिकांना ड्रेनेजची दुर्गंधी

Laxman Dhenge
वाघोली : पुढारी वृत्तसेवा : वाघोली येथील संत श्री तुकारामनगर येथील गल्ली नंबर चारमध्ये गुडघाभर ड्रेनेजचे पाणी साचल्याने रहिवाशांना ऐन दिवाळीत दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला. आवश्यक त्या उपाययोजना करून ही समस्या सोडवावी अन्यथा क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
संत श्री तुकारामनगर परिसरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज लाईन नसल्याने या ठिकाणी साधारण वीस बाय पंधराचा सिमेंटचा हौद बांधण्यात आला आहे. हौदामध्ये ड्रेनेजचे पाणी साठवून ते मड पंपाद्वारे वाघेश्वर उद्यानाजवळील पंपिंग हाउस सोडले जाते. परंतु, ऐन दिवाळी सणात मड पंप बंद पडला. पर्यायाने संतनगर परिसरात गुडघाभर दुर्गंधीयुक्त पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना उटण्याच्या सुगंधाऐवजी दुर्गंधीने दिवाळी साजरी करावी लागली.
माजी लोकप्रतिनिधी ज्ञानेश्वर कटके, अनिल सातव पाटील यांनी पाणी काढण्यासाठी प्रयत्न केले. परंतु महापालिका प्रशासनाला याबाबत वारंवार कळवूनदेखील दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला. ग्रामपंचायत असताना पंप चालू-बंद करण्यासाठी कर्मचारी होता. परंतु, सध्यस्थितीत हे काम नागरिकांनाच करावे लागत आहे. दर गुरुवारी विद्युतपुरवठा खंडित केला जातो, त्यादिवशीसुद्धा अशाच परिस्थितीचा  सामना येथील रहिवाशांना करावा लागतो. बोअरवेलमध्येसुद्धा ड्रेनेजचे पाणी पाझरल्याने त्यातून येणारे पाणीदेखील वापरण्याजोगे राहिले नाही. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी
केली आहे.
नागरिकांनी कर भरावा यासाठी महापालिकेची आग्रहाची भूमिका असते. परंतु मूलभूत सुविधा देणेबाबत प्रशासन उदासीन आहे. संत श्रीतुकाराम नगर परिसरात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नुकताच येरवडा येथे डासांपासून पसरणारा 'झिका' विषाणूचा रुग्ण आढळला असून, येथेही नऊ ते दहा जणांना डेंग्यू झाला आहे.
-प्रवीण काळे, संत श्रीतुकाराम नगर, रहिवाशी.
संत तुकाराम नगरमध्ये सांडपाणीच्या समस्येची लवकरच पाहणी केली जाईल. त्यानंतर योग्य त्या उपाययोजना करून रहिवाशांची गैरसोय दूर केली करण्यात येईल.
-ए. व्ही. ढमाले, 
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, महापालिका 
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT