नारायणगाव : येडगाव धरण परिसरातील खंडोबामाळ येथे बुधवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास सहा शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबलची चोरी झाल्याची घटना घडली. दोन दिवसांपूर्वीच गणेशनगर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या होत्या. व लाखो रुपयांचा फटका बसला. त्यानंतर पुन्हा खंडोबामाळ परिसरात चोरी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
केबल चोरी करणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. मागील साडेतीन महिन्यांतील या भागातील ही चौथी मोठी घटना असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. फेब्रुवारी २०२६ पासून आजअखेर येडगाव धरण जलाशयातील खंडोबामाळ व इंदिरानगर परिसरातील सुमारे शंभर कृषी पंपांच्या केबल चोरीला गेल्या आहेत. मात्र अद्याप केबल चोरट्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
येडगाव परिसरातील इंदिरानगर, खंडोबामाळ व दोन देवळे या भागात सुमारे ५०० कृषी उपसा सिंचन योजना आहेत. रात्रीच्या वेळी चोरटे कृषी पंपांच्या तांब्याच्या तारा असलेल्या केबल चोरी करून त्या भंगार व्यवसायिकांना विक्री करत असल्याचे सांगितले जाते. या भागातील केबल चोरीचे सत्र नोव्हेंबर २०२० पासून सुरू असून एप्रिल २०२२ मध्ये नारायणगाव पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह ओतूर येथील भंगार व्यावसायिक गफूर शेख याला ताब्यात घेत सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. दरम्यान, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी खंडोबामाळ परिसरातील सुमारे ५५ कृषी पंपांच्या केबल चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर ११ मे २०२६ रोजी इंदिरानगर परिसरातील ४० कृषी पंपांच्या केबल चोरीच्या घटना घडल्या.
आता पुन्हा सहा शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून तर काहींनी उधारीवर नवीन केबल खरेदी केल्या होत्या. मात्र काही दिवसांतच त्या पुन्हा चोरीला जात असल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
आज पहाटे खंडोबामाळ परिसरातील राजेंद्र नेहरकर, समीर गावडे, माऊली शिंदे, बारकू शिंदे, रामदास ढमक आदी सहा शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या. सकाळी फौजदार जगदेव पाटील व आदिनाथ लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान संदर्भात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, परिसरात पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून स्थानिक तरुण व शेतकऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. केबल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.