Diveagar Beach Drowning News
श्रीवर्धन : पुण्यातील आळंदी परिसरातील एका महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांचा श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरासह शैक्षणिक वर्तुळातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
४४ जणांची गेली होती सहल
मिळालेल्या माहितीनुसार,आळंदी नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील 'विनर्स अकॅडमी' या खासगी क्लासमधील इयत्ता अकरावीचे ४२ विद्यार्थी आणि दोन शिक्षक असे एकूण ४४ जण दिवेआगर येथे सहलीसाठी आले होते. समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्यानंतर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी विद्यार्थी समुद्रात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी खोल पाण्यात वाहून गेले व त्यांचा बुडून मृत्यू झाला
स्थानिक वॉटर स्पोर्ट्स मालकाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये खळबळ उडाली. दिवेआगर येथील भाऊ मारुती साळुंखे महाकाली वॉटर स्पोर्ट्स'चे मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात शोधमोहीम राबवली. आपल्या जीवाची पर्वा न करता भाऊ साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक प्रयत्नांनंतर आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
"मी दररोज तिथे जातो. मुलं बुडत असल्याचे मला एकाने पळत पळत येऊन सांगितले. मी लगेचच माझी टीम घेऊन समुद्रात उतरलो. आम्ही मुलांना बाहेर काढले, पण दुर्दैवाने त्या सर्वांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता."भाऊ मारुती साळुंखे (महाकाली वॉटर स्पोर्ट्सचे मालक)
पोलीस आणि प्रशासनाची घटनास्थळी धाव
दुर्घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष आवटी हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील वैद्यकीय तपासणी व कायदेशीर प्रक्रियेसाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहेत.
या दुर्दैवी घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ऐन पर्यटनाच्या हंगामात घडलेल्या या दुःखद घटनेमुळे दिवेआगर व परिसरात शोककळा पसरली आहे.
मयत मुलांची नावे खालीलप्रमाणे
1) तन्मय दत्तात्रय वहीले
2) सुमित भरत अहिरे
3) प्रणव रामदास बनसोडे
4) कैवल्य सतीश वासनकर
5) राजवीर युवराज वहीले
6) यश किरण वानखेडे
7) सोहम तुकाराम भांडवलकर
8) कौस्तुभ संदीप दौंड
सर्व जण वय 16 वर्षे, राहणार आळंदी, पुणे