पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा येथील जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून 30 लाख भीम अनुयायी अभिवादनासाठी येतील, अशी शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती कोरेगाव भीमा जयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली. पुणे येथे बुधवारी (दि. 27) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डंबाळे बोलत होते. या वेळी डॉ. सिध्दार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, मिलिंद अहिरे, सुवर्णा डंबाळे, स्नेहा माने आदी उपस्थित होते.
यंदा अनुयायींची वाढती संख्या लक्षात घेता जयस्तंभ अभिवादन सोहळा 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. 31 डिसेंबर रोजी अंदाजे 5 लाख अनुयायी जयस्तंभास अभिवादन करतील. विविध शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणार्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी केली जाईल.
1 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजता राज्य शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे जयस्तंभास मानवंदना देणार आहेत. सकाळी साडेआठ वाजता समता सैनिक दलाची मानवंदना परेड बँडपथक संचलनासह अत्यंत दिमाखदार पध्दतीने होणार आहे. यात सुमारे 800 पेक्षा अधिक समता सैनिक सहभागी होणार आहेत. साडेनऊ वाजता भारतीय सैन्यदलातील महार रेजिरमेंटमधील निवृत्त 1500 सैनिकांची मानवंदना परेड आयोजित करण्यात आली आहे. साडेदहा वाजल्यानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांची ढोल व लेझीम पथके सहभागी होणार आहेत, असे डंबाळे यांनी सांगितले.
हेही वाचा