पुणे; पुढारी वृत्तसेवा : "एल-निनो'मुळे पाऊस लांबण्याची शक्यता विचारात घेऊन शहराला 31 ऑगस्टपर्यंत 7.94 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे. या मागणीवर जलसंपदा विभाग काय निर्णय घेते, यावर शहरातील पाणीकपात अवलंबून राहणार आहे.
महापालिकेकडून शहरासाठी सध्या खडकवासला धरणातून प्रतिदिन 1470 एमएलडी तर भामाआसखेड धरणातून प्रतिदिन 150 ते 170 एमएलडी पाणी शहरासाठी घेतले जाते. सध्या शहरात कोणतीही पाणीकपात नाही. त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत 7.94 टीएमसी पाणी महापालिकेस राखीव ठेवले गेल्यास शहरावर उन्हाळ्यात पाणीकपातीचे संकट ओढावणार नाही.
मात्र, "एल-निनो'मुळे राज्यात यंदा पावसाळा लांबल्यास पाणीटंचाईची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यातच उन्हाळा तीव्र असण्याची चिन्हे आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून पाणी व्यवस्थापन आराखडा व आकस्मिक पाणीपुरवठा नियोजन आराखडा करा, असे आदेश राज्य शासनाने महापालिकेस दिले आहेत. उन्हाळ्यातील स्थितीबाबत महापालिका आणि जलसंपदा विभागाची बैठक नुकतीच झाली.
शासनाच्या आदेशानुसार महापालिकेस 31 ऑगस्टअखेर शहरासाठी किती पाणी हवे, याची माहिती जलसंपदा विभागाला सादर केली आहे. त्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांसाठी खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून 7.94 टीएमसी पाणी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. मात्र, अंतिम निर्णय शासन तसेच जलसंपदा विभाग घेणार आहे.