पुणे

Pune NCP vs BJP : पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काची, सर्वाधिक ३७० संख्याबळ असल्याचा दावा; भाजपला दिले प्रत्युत्तर

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काची असून आमच्याकडे सर्वाधिक ३७० जागांचे संख्याबळ आहे. त्यामुळे स्वाभाविक आणि न्यायाने ही जागा आमचीच असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी या जागेवर दावा करणे चुकीचे असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादीकडून भाजपाला देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते निलेश निकम व कार्याध्यक्ष प्रदिप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडली. विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरून महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या भाजप व राष्ट्रवादीमध्येच रस्सीखेच सुरू आहे. मित्रपक्षांच्या आघाड्यासह आमच्याकडे ३३३ संख्याबळ असल्याचा दावा करीत भाजपने पुण्याच्या जागेची मागणी केली आहे. त्यावर राष्ट्रवादीने प्रत्युत्तर देत भाजपपेक्षा आमच्याकडे अधिक म्हणजेच ३७० जागांचे संख्याबळ आहे. तसेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीने केलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे संख्याबळ, पक्षाची ताकद आणि जनाधार पाहता यावेळीही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी आम्ही पक्ष प्रमुखांकडे केली असल्याची माहिती शहराध्यक्ष टिंगरे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, भाजपने मांडलेले गणित चुकलेले आहे. या जागेवरून वाद घालणे चुकीचे आहे. मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीने नेहमीच महायुतीमध्ये समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमच्या हक्काच्या जागेबाबत मित्रपक्षांकडूनही त्याच संवेदनशीलतेची आणि सहकार्याची अपेक्षा आहे. आमच्या पक्षात कोणताही वाद विवाद नसून दहा पेक्षा अधिक जण इच्छुक आहेत. येत्या मंग़ळवारी त्यावर मुंबईत निर्णय होईल असेही टिंगरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT