Pune Navale Bridge Accident | क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले; मृतदेहांचा कोळसा 
पुणे

Pune Navale Bridge Accident | क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले; मृतदेहांचा कोळसा

अग्निशमनचे लोक जळालेले मृतदेह काढताना पाहून अंगाचा थरकाप उडाला

पुढारी वृत्तसेवा

पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पूल पुन्हा एकदा रक्ताने आणि आक्रोशाने न्हाऊन निघाला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. गुरुवारी (दि.13) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास, एका नियंत्रण सुटलेल्या अजस्र ट्रेलरने एका चारचाकीला अक्षरशः चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, क्षणात गाडीने पेट घेतला आणि आत बसलेल्या संपूर्ण कुटुंबाची... अगदी एका निष्पाप लहान मुलासह... नुसती राख झाली. हाडा-मांसाचा, रक्ताचा माणूस केवळ राख बनून मागे उरला.

या अपघाताची दाहकता इतकी होती की, रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नाही. जळलेली गाडी कोणत्या कंपनीची होती, हेही कळू शकले नाही. पोलिस आणि बचाव पथकाला फक्त जळालेला सांगाडा आणि राखेचे ढीग दिसले. जगण्याची उमेद घेऊन निघालेल्या त्या कुटुंबाचा, त्या लहानग्या बाळाचा आवाज, त्यांचे हसणे, क्षणात या महामार्गावर विरून गेले. मागे उरला तो फक्त आक्रोश आणि जळिताचा वेदनादायी वास. नियंत्रण सुटलेल्या यमदूत बनून आलेल्या ट्रेलरने केवळ एकाच चारचाकीला नाही, तर इतरही वाहनांना धडक दिली. आजूबाजूला जखमींचा आक्रोश, किंकाळ्या आणि रडण्याचा आवाज परिसरात घुमत होता. रस्ता रक्ताने माखला होता. या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला.

मृतदेह पाहून अंगावर शहारे!

एका रिक्षाचालकाने सांगितले, मी सर्व्हिस रस्त्यावरून नवले हॉस्पिटलकडे भाडे घेऊन निघालो होतो. सहाच्या सुमारास एक भलामोठा कंटेनर वाहने उडवीत आला होता. मी पुढे गेलेलो होतो पण आवाज आणि आरडाओरडा झाल्याने मागे येऊन पहिले तर मोठा अपघात होऊन गाडीला आग लागली होती. काही वेळाने अग्निशमनचे लोक जळालेले मृतदेह काढताना पाहून अंगाचा थरकाप उडाला.

या घटनेत कार व कंटेनर पूर्णतः दबल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना जळालेले मृतदेह काढताना अवजड मशिनरी वापरून दबलेले वाहन ओढून मृतदेह काढावे लागले. मृतदेह अगदी कार व कंटेनरच्या अवषेशाला चिकटल्याने काढताना मोठ्या अडचणी येत होत्या. जळालेले मृतदेह पाहून पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी काळजावर दगड ठेवून हे मृतदेह वाहनातून काढून पुढील प्रक्रियेसाठी ससून रुग्णालयाकडे पाठविले. नवले पुलावर घडलेली घटना ही थरकाप उठविणारी अन् नागरिकांच्या डोळ्यांपुढून न जाणारी होती.

अपघातापूर्वीच कंटेनरचालकाने दिला होता इशारा

मेरे गाडी का ब्रेक फेल हैं... हट जाओ!

पुणे / वारजे : नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातापूर्वी काहीक्षण आधीच हायवेवर थरारक दृश्य पाहायला मिळाले. प्रत्यक्षदर्शी वाहन चालकाने सांगितले की, अपघात घडण्यापूर्वी कंटेनरचालक जोरात ओरडत होता “मेरे गाडी का ब्रेक फेल है... हट जाओ!”

हा कंटेनर वारजेच्या दिशेने वेगात जात होता. प्रत्यक्षदर्शी वाहनचालकाने सांगितले, “माझ्या गाडी शेजारीच हा कंटेनर होता. चालक घाबरलेल्या अवस्थेत हिंदीतून ओरडत होता की गाडीचा ब्रेक फेल झाला आहे. मी तत्काळ गाडी बाजूला घेतली आणि पुढे गेलो. काही सेकंदातच नवले पुलाजवळ भीषण आवाज झाला अन् अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT