पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून जागच्या जागी अडकलेली वाहने  (Pudhari Photo)
पुणे

Pune Nashik Highway | रुग्णवाहिका अडकल्या, प्रवाशांचे हाल, पोलिस गायब; राजगुरुनगर-चाकण दरम्यान वाहतूक कोंडी

पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर ते चाकण दरम्यान आज सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली

पुढारी वृत्तसेवा

Rajgurunagar to Chakan traffic

खेड : पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर ते चाकण दरम्यान रविवारी (दि. १६) सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शनिवार, रविवारच्या सलग दोन सुट्ट्यांना नाशिक, शिर्डी आणि इतर ठिकाणांहून पुण्याकडे परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांसह दैनंदिन वाहतूक एकाच वेळी रस्त्यावर आल्याने ही कोंडी उद्भवली. सायंकाळी ४ वाजल्यानंतर सुरू झालेली ही वाहतूक कोंडी रात्री उशिरापर्यंत कायम होती. वाहने ३ ते ५ तास जागच्या जागी अडकून होती. यात लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांचे मोठे हाल झाले.

या कोंडीचा वैद्यकीय आपत्कालीन सेवांवर मोठा परिणाम झाला असून रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. राजगुरुनगर परिसरातील कोंडीत अनेक रुग्णवाहिका अडकल्या होत्या. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडथळा निर्माण झाला.

चाकणच्या तळेगाव चौक, आंबेठाण चौक आणि रोहकल फाटा वगळता महामार्गाच्या इतर महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिस नियमनासाठी नव्हते. शिरोली आणि वाकी फाट्यांवर वाहनचालकांमध्ये पुढे कोण जावे यावरून वाद झाले. काहींनी स्वतःहून वाहने बाजूला लावून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे गोंधळ वाढतच गेला.

सलग सुट्ट्या अथवा सुटीच्या दिवशी राजगुरुनगर परिसरात वारंवार कोंडी होत असतानाही पोलिस यंत्रणा कोणत्याही पूर्वतयारीशिवाय निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला. नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या कार, बस, ट्रक आणि दुचाकींची प्रचंड संख्या पाहता महामार्गावर एकच गोंधळ माजला होता. शिर्डी व नाशिक पर्यटनावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी महामार्ग अक्षरशः फुलून गेला होता. राजगुरुनगर आणि चाकण परिसरातील नागरिकांनी पोलिस आणि महामार्ग प्राधिकरणावर संताप व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT