Narayangaon Warulwadi house burglary
नारायणगाव : नारायणगाव येथील कोऱ्हाळे विटेमळ्यातील वैभव रेसिडेन्सी या सोसायटीमधील फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने, २५० ग्रॅम चांदीचे दागिने, ६० हजार रुपये रोख, असा एकूण २० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वारुळवाडी येथे बंद फ्लॅट फोडून पाच लाख रुपये किमतीचे दागिने चोरी गेले आहेत. नारायणगाव परिसरामध्ये चोऱ्यांचे सत्र वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली.
विष्णू भागुजी सांगडे हे खोडद रस्त्यालगत असलेल्या वैभव रेसिडेन्सी सोसायटीमध्ये कुटुंबासमवेत राहतात. मंगळवारी (दि. १४) पहाटे साडेचारच्या सुमारास फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून विष्णू सांगडे व त्यांच्या पत्नी हे दोघे मुक्ताबाई देवी मंदिरात काकड आरतीसाठी गेले होते. या वेळी फ्लॅटमध्ये त्यांचा मुलगा, सून व पुतण्या झोपले होते. दरम्यान, साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फ्लॅटचा कडीकोयंडा गॅसकटरने तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. फ्लॅटमधील कपाटाचे कुलूप तोडून डब्यात ठेवलेले २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, २५० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख ६० हजार रुपये असा एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
सकाळीच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी पथकासह भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तसेच ठसेतज्ञ आणि श्वानपथक यांनाही पाचारण करण्यात आले होते, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सपांगे यांनी दिली.
विष्णू भागुजी शिंगाडे यांनी मंचर येथे राहत असलेल्या बहिणीला घर घेण्यासाठी हे दागिने दिले होते. बहिणीने हे दागिने बँकेत ठेवून घरासाठी पैसे उपलब्ध केले होते. पैशाची उपलब्धता झाल्यावर बहिणीने भावाचे दागिने बँकेतून सोडून दोन दिवसांपूर्वी नारायणगाव येथे सुपूर्त केले होते. शिंगाडे यांनी हे दागिने जर बँकेत ठेवले असते तर कदाचित अशी वेळ आली नसती.