पुणे

पुणे पालिकेचा एड्स सेल समुपदेशकाविनाच !

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एचआयव्हीसंदर्भातील जनजागृती मोहिमेसाठी महापालिकेच्या एड्स सेलतर्फे तपासणी, उपचार ही प्रक्रिया राबवली जाते. एचआयव्हीग्रस्त रुग्णांचे समुपदेशन हा प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असतो. मात्र, महापालिकेचा एड्स सेल गेल्या महिनाभरापासून समुपदेशकाविना कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

पुणे महानगरपालिकेने ऑक्टोबर 2022 मध्ये 9 समुपदेशकांची नियुक्ती केली होती. गर्भवती स्त्रिया, रेड लाइट भागात राहणार्‍या स्त्रिया आणि किशोरवयीन मुलींचे समुपदेशन करणे समुपदेशकांचे मुख्य काम असते. सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, 'जनजागृती कार्यक्रमाचा भाग म्हणून 'रॅट' चाचण्या केल्या जातात आणि त्या पॉझिटिव्ह आल्या, तर 'एलिसा' चाचणी केली जाते. रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्ण आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे समुपदेशन केले जाते.

ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान सहा महिन्यांसाठी 9 समुपदेशकांची भरती करण्यात आली होती. 1 एप्रिलपासून पूर्वी नियुक्त केलेल्या समुपदेशकांचा करार संपला आहे. सध्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू आहे. आयुक्तांनी मान्यता दिल्यावर लगेच समुपदेशकांची नियुक्ती केली जाईल.-

                    -डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

समुपदेशकांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी आणि समुपदेशक म्हणून खासगी किंवा सरकारी रुग्णालयात तीन वर्षांचा अनुभव हवा. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान, 26,100 जणांचे समुपदेशन करण्यात आले. दररोज सरासरी 290 लोकांना समुपदेशन
केले गेले.

SCROLL FOR NEXT