पुणे: पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थिती, रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी आणि आपघात यांची संपूर्ण माहिती मुंबई महापालिकेतील सुसज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळते. त्याच धर्तीवर आता पुणे महापालिकेमध्येही सुसज्ज असा आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात येणार आहे.
यासाठी 2 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. हा कक्ष पावसाळ्यापूर्वी उभारण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि भवन रचना विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.
महापालिकेच्या हद्दीमध्ये पावसाळ्यामध्ये मुळा, मुठा नदी आणि ओढ्यांना येणारा पूर, ढगफुटीसारख्या घटनांमुळे रस्त्यांनाही पुराचे स्वरूप येत असल्याने मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते. एवढेच नव्हे, तर अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीमध्ये लाखो नागरिकांना मनस्ताप सोसावा लागतो. यासोबतच भूकंप व अन्य मानव निर्मित आपत्तींचीदेखील सातत्याने भीती असते.
या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील दीर्घकाळ सेवेच्या अनुभवातून महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सर्व यंत्रणांनी सुसज्ज असा आपत्ती व्यवस्थापन कक्ष निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका भवनमधील जुन्या इमारतीतील पश्चिमेकडील विंगमधील मुख्य लेखा परीक्षक विभाग, विशेष शाखेचे उपायुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, स्वच्छ सर्वेक्षण अभियान, बांधकाम विकास आणि विधी विभागाचे स्टोअर रूम इतरत्र हलवून या संपूर्ण मजल्यावर फक्त आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुरुस्तीची कामे करून इंजिनिअरींग रूम, कंट्रोल रूम, कॉन्फरन्स रूम, कन्सल्टेशन रूम, कॉम्प्युटर व सर्व्हर रूम, लायब्ररी, आठ बेडची सुविधा असलेली स्टाफ रेस्ट रूम असे नियोजन करण्यात आले आहे.
यासाठी साधारण चार कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच हा कक्ष 365 दिवस चोवीस तास सुरू ठेवण्यासाठी 65 ते 70 अधिकारी आणि कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, नियोजित आपत्ती व्यवस्थापन कक्ष असलेल्या दुसर्या मजल्यावरील जी कार्यालये अन्यत्र हलविण्यात येणार आहेत त्यांना सावरकर भवन, सध्याचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महापालिका भवन येथील तळमजल्यावरील कर आकारणी भांडार विभागाच्या जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहे.
सध्याच्या कक्षात मोठी गैरसोय
महापालिका आयुक्त कार्यालयाच्या वर असलेल्या चौथ्या मजल्यावर सध्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे. याठिकाणी शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींद्वारे प्रमुख ठिकाणची लाइव्ह स्थिती पाहाण्याची सुविधा आहे. कंट्रोल रूम व अधिकारी व कर्मचार्यांना बसण्याची जागा आहे. अवघ्या 640 चौ.फूट अडगळीच्या जागेत अगदी दाटीवाटीत कर्मचार्यांना बसावे लागते. याठिकाणी स्वच्छतागृहाची आणि लिफ्टचीदेखील व्यवस्था नाही. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्यांची मोठी गैरसोय होते.