Pune Municipal Engineers Election Duty Pudhari
पुणे

Pune Municipal Engineers Election Duty: मतदार यादी पडताळणीसाठी अभियंते नियुक्त; पुण्यात विकासकामे ठप्प

पथ व भवन विभागातील ४५ अभियंते निवडणूक कामात; पालखी सोहळा, रस्ते दुरुस्ती आणि इतर प्रकल्पांवर परिणाम होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या पथ आणि भवन विभागातील अभियंत्यांची मतदार यादी विशेष पडताळणी (एसआयआर) मोहिमेसाठी नियुक्ती केल्याने शहरातील महत्त्वाची विकासकामे आणि देखभाल दुरुस्तीची कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांतील अभियंत्यांना निवडणूक कामातून मुक्त करून त्यांच्या मूळ कामावर नियुक्त करण्याची मागणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादी पडताळणी मोहीम सुरू असून, पुण्यात या कामासाठी महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये पथ विभागातील २५ आणि भवन विभागातील २० अभियंत्यांचा समावेश आहे.

दरम्यान, पुढील आठवड्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन होणार असून, त्यासाठी आवश्यक सुविधा, रस्त्यांची दुरुस्ती आणि इतर तयारीची जबाबदारी पथ व भवन विभागावर आहे. याशिवाय पावसामुळे रस्त्यांच्या देखभालीची कामे वाढली असून, अनेक ठिकाणी खोदकामानंतर रस्ते अद्याप पूर्ववत झालेले नाहीत.

जानेवारीमध्ये होणाऱ्या 'पुणे ग्रँड टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने रस्ते दुरुस्ती आणि सुशोभीकरणाची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. मात्र, अभियंते निवडणूक कामात व्यस्त असल्याने ही कामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अभियंत्यांना मतदार यादी पडताळणीच्या कामातून मुक्त करण्याची विनंती करण्यात आली असून, याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT