पुणे : कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झालेल्या प्रभाग क्रमांक २८ मध्ये यंदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक अटीतटीची लढत पाहायला मिळाली. शेवटच्या फेरीपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज नथुराम लोखंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या विनया प्रसाद बहुलीकर यांचा अवघ्या २२८ मतांनी पराभव करत विजय खेचून आणला.
सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून प्रभाग २५ (शनिवार पेठ - फुले मंडई) आणि प्रभाग २७ (नवी पेठ - पर्वती) मध्ये भाजपने आपले वर्चस्व राखले होते. या दोन्ही प्रभागांतील चारही उमेदवार निवडून आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. मात्र, सायंकाळी साडेचार वाजता जेव्हा प्रभाग २८ ची मतमोजणी सुरू झाली, तेव्हा 'जनता वसाहत - हिंगणे खुर्द' मधील कल वेगळा दिसू लागला.
'क' गटातील ही लढत सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने सर्वांचे लक्ष याकडे होते. राष्ट्रवादीचे सूरज लोखंडे आणि भाजपच्या विनया बहुलीकर यांच्यात मतांची टक्केवारी एखाद्या हिंदोळ्यासारखी वर-खाली होत होती. अखेरच्या फेरीपर्यंत निकाल सांगणे कठीण झाले होते.
सूरज लोखंडे (राष्ट्रवादी): ११,४५४ मते
विनया बहुलीकर (भाजप): ११,२२६ मते
विजयी मताधिक्य: २२८
प्रभाग २८ मधील 'ब' आणि 'क' या दोन्ही गटांत राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारली. प्रभाग २५ आणि २७ मध्ये निर्भेळ यश मिळवणाऱ्या भाजपला प्रभाग २८ मध्ये मात्र मतदारांनी धक्का दिला. राष्ट्रवादीच्या या विजयामुळे भाजपची या क्षेत्रातील क्लिन स्वीपची स्वप्ने धुळीस मिळाली.
दिवसभर जल्लोष साजरा करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना विनया बहुलीकर यांचा अवघ्या २२८ मतांनी झालेला हा निसटता पराभव पचवणे कठीण गेले. सर्व काही सुरळीत सुरू असताना शेवटच्या क्षणी मिळालेला हा धक्का कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. अनेक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती. या निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन गोंधळही पाहायला मिळाला.
प्रभाग क्रमांक २८ अ
१) रिठे वृषाली आनंद, भाजप - १६७८९
प्रभाग क्रमांक २८ ब
१) गदादे प्रिया शिवाजी- राष्ट्रवादी काँग्रेस - १७२४५
प्रभाग क्रमांक २८ क
१) सूरज नथुराम लोखंडे - राष्ट्रवादी काँग्रेस - ११४५४
प्रभाग क्रमांक २८ ड
१) ॲड. प्रसन्न घनश्याम जगताप- १४०००