धायरी : पुढारी वृत्तसेवा सिंहगड रोड परिसरातील दोन सोसायट्यांच्या इमारतीवरील टेरेसवर केलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाने सोमवारी कारवाई केली. एका सोसायटीच्या टेरेसवर कुलूप लावल्याने अधिकार्यांना कारवाई न करताच मोकळ्या हाताने परतावे लागले. सनसिटी येथील प्रियांका अपार्टमेंट, माणिक बाग येथील त्रिवेणी संगम अपार्टमेंट या दोन सोसायट्यांच्या टेरेसवर केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. तर, अथर्व कॉम्प्लेक्स या सोसायटीच्या टेरेसला कुलूप लावले असल्यामुळे महापालिका अधिकार्यांना तेथे कारवाई करण्यात आली नाही.
या तिन्ही सोसायट्यांना महापालिका बांधकाम विभागाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या होत्या. ही कारवाई बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता प्रताप धायगुडे, कनिष्ठ अभियंता धनंजय खोले, संदेश पाटील यांच्या पथकाने केली. या वेळी अडीच ते तीन हजार स्वे. फूट इमारतीच्या टेरेसवरील अनधिकृत बांधकाम गॅस कटर व इतर साहित्याच्या साहाय्याने पाडण्यात आले.