पुणे

पुणे महापालिका उभारणार पीपीपी तत्त्वावर गृहप्रकल्प

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेकडून सध्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुमारे तीन हजार सदनिका बांधल्या जात आहे. पुढील टप्प्यात पीपीपी (खासगी सहभाग) तत्त्वावर पाच हजार सदनिका बांधण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणारी घरे दिली जातात.

राज्यातील 51 शहरांत ही योजना राबविली जात असून, पुणे शहरात पाच प्रकल्पांचे काम सुरू आहे. वडगाव खुर्द येथे महापालिका सदर योजनेत स्वत: बांधकाम करीत असून, या ठिकाणी 1 हजार 108 सदनिका बांधल्या जात आहेत. या प्रकल्पातील लाभधारकांना मार्च 2023 मध्ये घरांचा ताबा दिला जाणार आहे.

शहरात सध्या हडपसर येथे तीन आणि खराडी येथे एक, असे एकूण पाच प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. या पाचही गृहप्रकल्पातील एकूण 2 हजार 918 सदनिकांपैकी केवळ 285 सदनिका शिल्लक आहेत. पुढील काळात महापालिकेच्या जागांवर पीपीपी तत्त्वावर गृहप्रकल्प राबविले जाणार आहेत.

हे प्रकल्प बाणेर, बालेवाडी, कोंढवा या भागांत राबविले जाणार आहे. याद्वारे पाच हजार सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून, निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT