पुणे: महापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह महापालिका आयुक्त आणि दोन अतिरिक्त परदेश दौऱ्यावर आहेत, तर उर्वरित एक अतिरिक्त आयुक्तही रजेवर आहेत. त्यामुळे पदाधिकारी, अधिकारी विदेश दौऱ्यावर आणि
महापालिका वाऱ्यावर, अशी अवस्था झाली असून, त्यामुळे महापालिकेचे कामकाज कोलमडल्याचे चित्र आहे.
महापौर मंजूषा नागपुरे यांच्यासह स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले तसेच अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर आणि शहरअभियंता अनिरुद्ध पावसकर हे सध्या जपान दौऱ्यावर आहेत. पुणे आणि ओकायामा या दोन शहरांमधील मैत्रीपूर्ण संबंधांना यंदा २० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून हे पदाधिकारी आणि अधिकारी जपानला गेले आहेत.
ते दि. ३ ऑगस्टला पुण्यात येणार आहेत. तर, आणखी एक अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे हे चारधाम यात्रेसाठी सोमवारपासून रजेवर आहेत. त्यातच आता महापालिका आयुक्त नवल किशोर राम व तिसरे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर हे तब्बल दहा दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर शुक्रवारपासून रवाना होत आहे.
परिणामी, गुरुवारी तर महापालिकेत आयुक्तांसह तीन आयुक्त, तसेच शहरअभियंता महापालिकेत उपस्थित नव्हते. त्यामुळे महापालिकेचे कामकाज कोलमडल्याचे चित्र दिसून आले.
एकीकडे आधीच विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महत्त्वाच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. त्यातच पदाधिकारी आणि अधिकारी यांचे परदेश दौरे सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामेही रखडत आहे. त्यामुळे आता नक्की दाद मागायची तरी कोणाकडे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.