पुण्यात तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. या निवडणुकीत पुढील पाच वर्षे शहराचा कारभार कोणाच्या हाती जाणार, हे पुणेकर ठरवत आहेत. सत्तेत असलेल्या भाजपला पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेस पुनरागमन करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ महापालिकेपुरती न राहता राजकीय प्रतिष्ठेची लढाई झाली आहे.
या निवडणुकीत Pune Municipal Corporation साठी तब्बल 165 जागा आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), शिवसेना, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे अशी चौरंगीपेक्षा अधिक रंगांची लढत पाहायला मिळाली. भाजपने सर्व 165 जागांवर उमेदवार दिले असून त्यापैकी दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण मिळून 1,150 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीची खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच रंगल्याचं दिसलं.
प्रचारादरम्यान भाजपने “125 जागा जिंकू” असा दावा केला होता. मेट्रो, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी रस्ते, विकासकामांचा मुद्दा भाजपने पुढे केला. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसने थेट सामान्य पुणेकरांना भिडणाऱ्या घोषणा केल्या, मोफत पीएमपी आणि मेट्रो बससेवा, तसेच छोट्या घरांना मिळकतकर माफी. या घोषणांनी निवडणुकीचं वातावरणच बदलून टाकल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत चर्चेचा विषय ठरली, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी एकहाती प्रचाराची धुरा सांभाळली. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानेही आपली ताकद लावली.
एकूणच पुणे महापालिकेची ही निवडणूक केवळ स्थानिक प्रश्नांपुरती मर्यादित न राहता, राज्यातील सत्तासमीकरणांची दिशा ठरवणारी ठरणार आहे. निकालातून पुणेकरांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.