पुणे : पुढारी वृत्तसेवा: रेल्वे प्रशासनाकडून खडकीजवळ 'लूप लाइन' उभारण्याचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यावर पुणे-मुंबईदरम्यान धावणार्या एक्स्प्रेस गाड्यांचा धावण्याचा वेळ 15 मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई प्रवासासाठी लागणार्या वेळेतील 15 मिनिटे कमी होणार आहेत.
असा होणार लूप लाइनचा फायदा
पुणे-लोणावळा मार्गावरून दररोज सुमारे दोनशे ते अडीचशे गाड्या दररोज धावतात. यात अनेक एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. एक्स्प्रेस गाड्यांबरोबर या मार्गावरून मालवाहू गाड्यादेखील धावतात. एक्स्प्रेस गाड्यांना जाण्यासाठी मालवाहू गाड्यांना बाजूला उभे करावे लागते; पण या गाड्यांना उभे राहण्यासाठी पुरेसी जागा नाही. त्यामुळे त्या मालवाहू गाड्या बाजूला होईपर्यंत एक्स्प्रेस गाड्यांचा वेग काही प्रमाणात कमी होतो. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने लूप लाइन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या लूप लाइनवर रेल्वेच्या मालगाड्या उभ्या राहिल्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढणार आहे.
वेळेची होणार बचत
पुणे-लोणावळा मार्गावर तीन स्थानकांवर लाँग लूप लाइन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-लोणावळा मार्गावरील देहू रोड, मळवली आणि दापोडी या तीन स्थानकांवर 'लूप लाइन' उभारण्यात येणार आहे. ही लाइन साधारण 1,400 मीटर असेल. यापैकी मळवली येथे लूप लाइनचे काम सुरू करण्यात येणार आहे. या लूप लाइनमुळे प्रत्येक स्थानकावर दहा ते बारा मिनिटे वेळेत फरक पडणार आहे.
पुणे-लोणावळा मार्गावर तीन रेल्वे स्थानकांवर 'लाँग लूप लाइन' तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत अर्धा तास फरक पडणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.
– इंदुराणी दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग