पौड : मुळशी धरण भागात ढोकळवाडी-चाचिवली येथे फिरण्यासाठी आलेल्या आठ मित्रांमधील दोन जण बुडाल्याची घटना रविवारी (दि. १६) दुपारी घडली. अनिश राऊत (वय १८, डॉ. पाटील काॅलेज, पिंपरी) आणि विशाल राठोड (वय १७, फत्तेचंद जैन विद्यामंदिर चिंचवड) अशी या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पडवळनगर-थेरगाव पिंपरी (पुणे) येथील अविश राऊत, विशाल राठोड, गोविंदा चाकली (वय १६), जीत लोंढे (वय १७), अथर्व राऊत (वय १६), राज यादव (वय १७), सोहम जाधव (वय १६), आदित्य बाबर (वय २०) हे आठ मित्र मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. यादरम्यान ते चाचिवली ढोकळवाडी येथे धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. अनिश व विशाल या दोघांना पाण्याच्या खोलाचा अंदाज न लागल्याने हे दोघे बुडाले. पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून दोघांचा शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव, पौड पोलहस व आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे व पथक, हिंजवडी येथील स्क्युबा डायव्हींगचे पथक यांच्याकडून शोधमोहिम सुरू आहे.