पुणे

Pune MPSC Students Protest : ‘भीमनवारांना हटवा, परीक्षा ऑफलाईन घ्या!’; पुण्याच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांचे आंदोलन

शास्त्री रस्त्यावर रोहित पवारांचा ठिय्या, पोलिसांची नाकाबंदी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात आणि सर्व परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्याच्या शास्त्री रस्त्यावर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू झाले असून, आमदार रोहित पवार यांनी स्वतः आंदोलनस्थळी पोहोचत विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावरच ठिय्या मांडला.

शास्त्री रस्त्यावर ठिय्या आणि पोलिसांची नाकाबंदी

परीक्षार्थींच्या प्रलंबित मागण्या आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या कार्यपद्धतीविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी शास्त्री रस्ता परिसर दणाणून सोडला. "भीमनवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे", "सर्व परीक्षा ऑफलाईनच घ्या" अशा गगनभेदी घोषणांनी परिसर गाजत होता. आंदोलनाची तीव्रता पाहता शास्त्री रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

पत्रकार संघात संवाद, नंतर मोर्चा गरवारे पुलाकडे

शास्त्री रस्त्यावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांनी गरवारे पुलावर आंदोलनाला सशर्त परवानगी दिली. या दरम्यान आमदार रोहित पवार यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात जाऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने सरकारवर जोरदार निशाणा साधला.

गांजवे चौकातून विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा

पत्रकार संघातून बाहेर पडल्यानंतर आमदार रोहित पवार आणि हजारो विद्यार्थी पायी चालत गांजवे चौकमार्गे गरवारे पुलाकडे रवाना झाले. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा हा मोर्चा कडक पोलीस बंदोबस्तात पुढे सरकत असून, पुण्यात विद्यार्थ्यांचा रोष शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT