पुणे

Pune MPSC Student Protest: चौथ्या दिवशीही पुण्यात विद्यार्थी आंदोलन तापलेलेच...

तीन वेगवेगळ्या ठिकाणी मागण्यांवरून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन जोरात, पुण्यात राजकीय वातावरण तापले

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन रविवारी (दि. ०४) चौथ्या दिवशीही तीव्र स्वरूपात सुरूच राहिले. शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असून, या आंदोलनांना विविध राजकीय नेत्यांनी भेटी दिल्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. परीक्षा पद्धतीमधील बदल आणि एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा मागण्यांसाठी चौथ्या दिवशीही पुण्यात तीन ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.

एस. एम. जोशी पूल (गरवारे कॉलेजजवळ) येथे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या सत्याग्रह आंदोलनात एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी आहे. याशिवाय ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तर लाल बहादूर शास्त्री रस्ता (अहिल्या शिक्षण मंडळ) येथे दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांची मुख्य मागणी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घ्यावी हीच आहे. तसेच, अलका टॉकीज चौक (टिळक चौक) येथे तिसऱ्या गटाचे आंदोलन वेगळ्या भूमिकेत असून, त्यांची मागणी परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह (वर्णनात्मक) पद्धतीने घ्यावी अशी आहे.

आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही राजकीय नेत्यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. एस. एम. जोशी पुलाजवळील आंदोलनाला खासदार संजय राऊत आणि सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांनी भेट दिली. लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील आंदोलनाला मंत्री नीतेश राणे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि समर्थन जाहीर केले.

तिन्ही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. एकीकडे एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा आणि दुसरीकडे परीक्षा पद्धतीबाबत (ऑब्जेक्टिव्ह विरुद्ध डिस्क्रिप्टिव्ह) विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या असल्या तरी, प्रशासनाकडून ठोस निर्णय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या भूमिकेवर तीनही गटाचे विद्यार्थी कायम आहेत. बड्या नेत्यांच्या एंट्रीमुळे या आंदोलनाला आता राज्यव्यापी राजकीय वळण मिळाले आहे. या आंदोलनावर प्रशासनाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT