पुणे : पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी अन् काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. दूरच्या नात्यातील एका 24 वर्षीय नराधम तरुणाने केवळ 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. इतकेच नाही तर त्याच्या या क्रूर कृत्यामुळे पीडित मुलगी ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ झाल्याचे उघड झाल्याचे दाखल गुन्ह्यात म्हटले आहे. मुलीला ताप आल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिची रक्त तपासणी केली असता हे भयानक सत्य समोर आले आणि परिसरात एकच खळबळ उडाली.(Latest Pune News)
या घटनेनंतर पीडितेच्या आईने तत्काळ समर्थ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत, कर्नाटक राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2021 पासून पुणे आणि कर्नाटक येथील आरोपीच्या गावी मुलीवर अत्याचार सुरू होते. खडकी परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीशी आरोपीने दूरचे नाते सांगून फोनवरून जवळीकता वाढवली आणि नंतर तिच्यावर अत्याचार केले. घडलेला प्रकार इतका गंभीर होता की, मुलगी घर सोडून निघून गेली होती, त्यामुळे खडकी पोलिस स्टेशनमध्ये तिचे अपहरणाचे प्रकरणही दाखल झाले होते. तिला शोधून काढल्यानंतर मुंढवा येथील एका महिला आश्रमात ठेवण्यात आले होते.
दरम्यान, मुलीला ताप आल्याने तिला ससूनमध्ये उपचारासाठी नेले असता, रक्त तपासणीत ती ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असल्याचा धक्कादायक अहवाल आला. त्यानंतर मुलीने आपल्या आईला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. पुढील तपास समर्थ पोलिस करत आहेत. या प्रकरणातील नराधम आरोपीला अद्याप अटक होणे बाकी आहे.
लॉजवर घडला अत्याचाराचा गुन्हा
आईने खडकी पोलिसांशी संपर्क साधला असता, अत्याचाराचा गुन्हा समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका लॉजमध्ये घडल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खडकी पोलिसांनी तातडीने पोक्सो अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी तो समर्थ पोलिसांकडे वर्ग केला आहे.