पुणे

Pune Metro News : दोन मेट्रो स्टेशनचा तिढा सुटे ना

Laxman Dhenge

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गातील गणेशखिंड रस्त्यावरील दोन मेट्रो स्टेशनबाबत तिढा निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या विकास आराखड्यातील रुंदीनुसार मेट्रो स्टेशन उभारावे, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे, तर त्यानुसार स्टेशन उभारायचे झाल्यास या मेट्रो प्रकल्पाला दोन वर्षांचा विलंब होईल, असा पवित्रा पुणे महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम जोरात सुरू आहे.

हिंजवडी, बालेवाडी, औंधमार्गे विद्यापीठ चौकातून गणेश खिंड रस्त्याने शिवाजीनगर न्यायालय असा या मेट्रोचा मार्ग आहे. त्यात गणेशखिंड रस्त्यावर आरबीआय कार्यालय आणि सिमला ऑफिस चौक या दोन ठिकाणी मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहेत. त्यानुसार या स्टेशनच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, आता अस्तित्वातील रस्ता 36 मीटरचा असून, विकास आराखड्यात तो 45 मीटर रुंदीचा आहे. त्यामुळे हे स्टेशन उभारताना आताच्या नियोजनानुसार न उभारता 45 मीटर रस्ता रुंदीकरणानुसार उभारावे, असे महापालिकेने पीएमआरडीएला कळविले आहे.

त्यावर पीएमआरडीने मात्र उलट पवित्रा घेतला आहे. 45 मीटर रस्ता रुंदीकरणानुसार जागा ताब्यात घेण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वातील नियोजनुसार वेळेत काम पूर्ण न होता या प्रकल्पास दोन वर्षे विलंब होईल, असे महापालिकेला कळविले आहे. त्यावर पालिका प्रशासनाने मात्र भूमिका कायम ठेवत पालिका ही स्टेशनसाठीची जागा ताब्यात घेण्यासाठी सर्वोतोपरी मदत करेल, असे म्हटले आहे. मात्र, स्टेशन 45 मीटर रस्ता रुंदीकरणानुसार झाले पाहिजे, अशी ठोस भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.

भविष्यातील नियोजनानुसार आवश्यकता

शहरातील प्रमुख महत्त्वाच्या रस्त्यांमध्ये गणेशखिंड रस्ता येतो. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. आताच्या रस्तारुंदीनुसार स्टेशन उभारल्यास त्याचे जिने पदपथावर येणार आहेत, त्यामुळे वाहतुकीला फटका बसू शकतो. येरवड्यात अशाच पध्दतीने स्टेशन रस्त्यावर असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आणि नागरिकांनी तेथील काम बंद पाडले. त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील आगामी काळातील परिस्थिती लक्षात घेता, 45 मीटर रस्ता रुंदीनुसारच दोन्ही मेट्रो स्टेशन उभारण्याची आवश्यकता असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

निर्णयाचा चेंडू उच्चस्तरीय समितीच्या कोर्टात

गणेशखिंड रस्त्यावरील ही दोन्ही स्टेशन आता 45 मीटर रस्ता रुंदीकरणानुसार करायची, की अस्तित्वातील 36 मीटर रस्त्यानुसार, यासंबंधीचा निर्णय आता उच्चस्तरीय समिती घेणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गणेश खिंड रस्त्यावरील वाहतुकीचे पुढच्या 50 वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन दोन्ही मेट्रो स्टेशन 45 मीटरच्या बाहेर असणे आवश्यक आहे. तशी विनंती आम्ही पीएमआरडीएला केली आहे. तसेच मेट्रो स्टेशनसाठी लागणारी आकाशवाणीसह अन्य सरकारी जागा ताब्यात घेण्यासाठी आम्ही मदत करू. तसेच यासंदर्भात आयुक्तांसमवेत बैठक लावून तातडीने निर्णय घेतला जाईल.

– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT