Pune Metro Ganesh festival revenue
पुणे: प्रसिद्ध व मानाच्या प्रमुख बाप्पांचे दर्शन, देखावे आणि विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या काळात तब्बल 37 लाख 16 हजार 511 नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. त्याद्वारे महामेट्रोला तब्बल 5 कोटी 67 लाख 27 हजार 741 रुपयांचे उत्पन्न मिळाले. मेट्रो सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतची प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नामध्ये गणेशोत्सव काळातच मेट्रोने आघाडी घेतली.
मागील महिन्यात 27 तारखेला मोठ्या जल्लोषात वाजतगाजत बाप्पाचे आगमन झाले. त्या दिवशी आणि अगोदर काही दिवसांपासून मेट्रोचे प्रवासी वाढायला सुरुवात झाली. गौरी, गणपती खरेदीसाठी बहुतांश नागरिकांनी मध्यवस्तीतील गर्दीचा पूर्वानुभव लक्षात घेता मेट्रोच्या सार्वजनिक वाहतुकीला पसंती देत मेट्रोने प्रवास केला. (Latest Pune News)
त्यानंतर बाप्पाच्या आगमनानंतरच्या दिवशी तर प्रवासीसंख्येत प्रचंड वाढ झाली. मंडई मेट्रो स्थानकाची दैनंदिन प्रवासीसंख्या दुप्पट, तिप्पट झाल्याचे समोर आले. यानंतरचे प्रत्येक दिवस मध्यवस्तीतील मेट्रो स्थानकातील प्रवासीसंख्येत आणि मेट्रोला मिळणार्या उत्पन्नात वाढ होत गेली.
गर्दीचे वाढते प्रमाण लक्षात घेता मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी गर्दीनियंत्रणासाठी सर्व यंत्रणा तैनात केली होती. त्यासोबतच त्यांनी यासाठी पोलिसांचीही मदत घेतली होती. श्रावण हर्डीकर, मेट्रो अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी गणेशोत्सवापूर्वीच मध्यवस्तीतील स्थानकांची पाहणी करून गर्दीनियंत्रणाबाबत नियोजन केल्यामुळे अनुचित घटना टाळण्यात मोठे यश मिळाले.
एकूण प्रवासीसंख्या
37 लाख 16 हजार 511
एकूण उत्पन्न
5 कोटी 67 लाख 27 हजार 741 रुपये