पुणे: पुणे शहर आणि परिसरातील मेट्रो प्रकल्पाचे जाळे विस्तारण्यास आता गती मिळणार आहे. यासाठी उपयुक्त ठरणार्या मेट्रोच्या विविध मार्गिकांच्या विस्तारासाठी आणि बिबवेवाडी, बालाजीनगर या दोन नवीन स्थानकांच्या उभारणीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरिडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरिडॉर, वनाज ते रामवाडी (मार्गिका क्र. 2) च्या विस्तारित मार्गिका वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी), पुणे मेट्रो मार्ग-4 (खडकवासला- स्वारगेट- हडपसर- खराडी) आणि नळ स्टॉप वारजे- माणिकबाग (उपमार्गिका) या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी घेण्यात येणार्या बाह्यसहाय्यित कर्जाचे आकस्मिक दायित्व स्वीकारण्यास, प्रकल्पांचे करारनामा, कर्ज करारनामा आणि दुय्यम वित्तीय करारनामे करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. (Latest Pune News)
बहुप्रतिक्षित स्वारगेट- कात्रज दरम्यानच्या मेट्रो मार्गामध्ये आता दोन नवीन स्थानकांची वाढ होणार आहे. त्यामुळे आगामी काळात होणार्या या मार्गावर आता एकूण पाच स्थानके असतील. यात बिबवेवाडी आणि बालाजीनगर ही नवीन दोन तर पूर्वीची पद्मावती, मार्केटयार्ड, कात्रज ही तीन, अशी एकूण पाच मेट्रो स्थानके स्वारगेट- कात्रज भूमिगत मेट्रोमार्गावर असणार आहेत. दोन स्थानकांसाठी येणार्या 683.11 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेचा 227.42 कोटी रुपये, ’ईआयबी’चे द्विपक्षीय कर्ज 341.13 कोटी रुपये, तर राज्य करांसाठी राज्य शासनाचे दुय्यम कर्ज 45.75 कोटी रुपये व व्याज रक्कमा राज्य शासनाचे अतिरिक्त बिनव्याजी दुय्यम कर्ज 68.81 कोटी रुपये अशा मिळून एकूण 683.11 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
दक्षिण भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार
मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2 च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्याच्या निर्णयामुळे पुणे शहरातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी मेट्रोप्रवास अधिक सुलभ होणार असून, वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.
पुणे-लोणावळा लोकलसाठी तिसरी, चौथी मार्गिका
पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसर्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर केलेल्या या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 5 हजार 100 कोटी रुपये असून, त्यामध्ये जमीन अधिग्रहण खर्चाचाही समावेश आहे. यातील 50-50 टक्के आर्थिक सहभागाची जबाबदारी केंद्र सरकार व राज्य शासन उचलणार आहेत. राज्य शासनाचा एकूण वाटा 2 हजार 550 कोटी रुपये इतका निश्चित केला आहे. राज्य शासनाच्या हिस्स्यातील
या 2 हजार 550 कोटींपैकी पुणे महानगरपालिका (20 टक्के) 510 कोटी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (20 टक्के) 510 कोटी, पीएमआरडीए (30 टक्के) 765 कोटी असा स्थानिक संस्थांचा सहभाग राहणार असून, उर्वरित रक्कम राज्य शासन देणार आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळा रेल्वे प्रवाशांचा वाढता ताण कमी होऊन उपनगरीय रेल्वे सेवांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
स्वारगेट- कात्रज भूमिगत मेट्रोमार्गावर दोन नवीन स्थानके वाढणार आहेत. पूर्वीची तीन आणि आत्ताची बिबवेवाडी, बालाजीनगर ही दोन, अशी एकूण पाच मेट्रो स्थानके टप्पा 2 च्या मार्गावर असतील. यासाठी लागणारा खर्च राज्यसरकार आणि महापालिका करणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता मिळाली आहे.- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक (आयएएस), महामेट्रो