शंकर कवडे
पुणे: मार्केट यार्डातील सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीचा थेट फटका आता शेतमालाच्या आवकेलाही बसू लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारातील शेतमालाची आवक तब्बल एक लाख टनांनी घटली आहे.
दुसरीकडे, उपबाजारांमधील आवक वाढल्याचे बाजार समितीच्या उलाढालीच्या तुलनात्मक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुख्य बाजारातील वाहतूक कोंडीमुळे शेतकरी आणि वाहनचालक उपबाजारांकडे वळत असल्याची चर्चा बाजार घटकांमध्ये सुरू झाली आहे.
मार्केट यार्ड परिसरात दररोज होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग आणि अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना बाजारात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
विशेषतः गर्दीच्या दिवशी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही 'मार्केट यार्डची कोंडी फोडा' असा सूर बाजार घटकांनी लावला होता.
अंतर्गत रस्ते मोकळे करणे, शास्त्रोक्त पार्किंग व्यवस्था उभारणे आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची मागणी व्यापारी व बाजार घटकांनी केली. दरम्यान, प्रत्यक्ष आवकेच्या आकडेवारीतच मुख्य बाजाराची पीछेहाट दिसत असल्याने वाहतूक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वाहतूक कोंडीमुळे शेतमाल वेळेत बाजारात पोहोचत नाही. तसेच खरेदी केलेला माल बाहेर नेण्यासही अडथळे येतात. त्याचा परिणाम व्यापारावर होतो. बाजारात येण्यासाठी तासन्तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याने शेतकरी आणि वाहनचालक शक्य असेल तेथे उपबाजारांचा पर्याय निवडत आहेत. मुख्य बाजारातील आवक घटणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे.- सौरभ कुंजीर, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी अडते असोसिएशन
बाजार आवारातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. वाहनांसाठी 'टॅगिंग' प्रणाली राबविण्यात येईल. बाजार आवारात अडीच तासांपेक्षा अधिक काळ रेंगाळणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच महापालिकेच्या समन्वयातून शिवनेरी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांना बाजारात ये-जा करणे अधिक सुलभ होईल.- प्रकाश जगताप, सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.