पुणे: न्यायालयात याचिका दाखल असताना आणि खरेदीखतापूर्वी पुणे बाजार समितीने गुरुवारी पुन्हा यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर 36 कोटी रुपये वर्ग केले. मनमानी पद्धतीने पैसे वळविल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून याप्रकरणी बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ, सचिव आणि संबंधित कर्मचारी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
यशंवत सहकारी साखर कारखान्याची जमीन 299 कोटी रुपयांना पुणे बाजार समितीच्या उपबाजारासाठी खरेदी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. मात्र, उच्च न्यायालयातील दाखल असलेल्या रिट याचिकेतील निर्णयाच्या अधीन हा व्यवहार करण्याची अट घालून याबाबत शासन निर्णय काढला आहे. (Latest Pune News)
नियमानुसार आणि कायदेशीर बाबींनुसार व्यवहार करण्याचे काही संचालकांनी बजावले होते. तरीही बाजार समितीने 36 कोटी रुपये कारखान्याच्या खात्यावर वर्ग केले.
राज्य शासनाने कारखाना जमीन व्यवहार करण्यास बारा एक नुसार परवानगी दिली आहे. त्यानुसार पैसे वर्ग केले असून करारानुसार टप्प्या-टप्प्याने निधी देणार आहोत. सर्व प्रक्रियेअंती खरेदीखत होईल.- प्रकाश जगताप, सभापती, बाजार समिती