Electric Crematorium Pudhari
पुणे

Pune LPG Gas Shortage Crematoriums: एलपीजी तुटवड्यामुळे स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिन्यांचा वापर

गॅस दाहिन्या बंद, वैकुंठ, खराडी, कोथरूड स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी पर्यायी उपाय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशभरात प्रोपेन आणि ब्यूटेन या घटकांचा प्राधान्याने घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गॅस उपलब्धतेत तात्पुरती अडचण निर्माण झाल्याने पुणे महापालिका हद्दीतील गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाकडून देण्यात आली.

गॅसटंचाईमुळे अंत्यसंस्कार प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी महापालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिन्या आणि एपीसी (एअर पोल्यूशन कंट्रोल) प्रणालीवर आधारित यंत्रणा कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी शक्यतो विद्युत दाहिन्यांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

बिबवेवाडीतील वैकुंठ स्मशानभूमीत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमार्फत गॅसपुरवठा होणाऱ्या दोन गॅसदाहिन्या सध्या सुरू राहणार आहेत. मात्र, धनकवडी आणि कात्रज परिसरातील नागरिकांनी या दाहिन्यांवर अतिरिक्त ताण येऊ नये, म्हणून शक्यतो पर्याय म्हणून विद्युत दाहिन्यांचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वैकुंठ स्मशानभूमीत सध्या कार्यरत असलेल्या तीन गॅस दाहिन्या गॅसटंचाईमुळे बंद राहणार असून, नागरिकांच्या सोयीसाठी तेथील पाच विद्युत दाहिन्या सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरळीत सुरू राहील, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे. दरम्यान, महापालिकेकडून नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून शहरातील विविध भागांतील विद्युत दाहिन्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या स्मशानभूमींतील विद्युत दाहिन्यांचा वापर करण्याचे आवाहन

  • येरवडा स्मशानभूमी (गुंजन चौक, नगर रोड)

  • खराडी स्मशानभूमी (खराडी गाव)

  • कैलास स्मशानभूमी (एसएसपीएमएस मैदानाजवळ, संगमवाडी)

  • कोथरूड स्मशानभूमी (गुरुगणेशनगर)

  • बाणेर स्मशानभूमी (औंध-बाणेर लिंक रोड)

  • गंगानगर स्मशानभूमी (हडपसर)

अंत्यविधीसाठी नागरिकांनी जवळच्या स्मशानभूमीतील विद्युत दाहिन्यांचा अधिकाधिक वापर करावा, ज्यामुळे वैकुंठ स्मशानभूमीवरील ताण कमी होईल आणि अंत्यसंस्काराची प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल.
मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT