Laser Speed Cameras Pudhari
पुणे

Pune Laser Speed Cameras: वाहनचालकांविरुद्ध कारवाई आणि अपघात रोखण्यासाठी लोणावळा-वडगाव महामार्गावर लेझर स्पीड कॅमेरे बसवले

वेगमर्यादा उल्लंघन रोखण्यासाठी आणि अपघात प्रतिबंधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचा प्रायोगिक उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना चाप लावण्यासाठी पुणे ग््राामीण पोलिसांकडून जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर वडगाव मावळ, लोणावळा येथे अत्याधुनिक लेझर स्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे भरधाव वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

‌‘महामार्गावर होणारे बहुतांश अपघात वेग आणि वाहनचालकांच्या चुकांमुळे घडतात. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई, तसेच अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे. जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर लोणावळा, वडगाव मावळ परिसरात हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ब्लूमबर्ग फिलान्थॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी आणि ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप या संस्थांकडून सहकार्य करण्यात आले आहे‌’, अशी माहिती पुणे ग््राामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिली.

लोणावळा, वडगाव मावळ परिसरात तीन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे दिवसा आणि रात्रीही कार्यान्वित राहतात. कॅमेऱ्यांकडून वाहनांचा अचूक वेग नोंदविला जातो. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा 320 किलोमीटर प्रतितासापर्यंतचा वेग नोंदविण्याची क्षमता या उपकरणांमध्ये आहे, असे गिल्ल यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 57 टक्के अपघात ग््राामीण क्षेत्रात 2022 आणि 2023 या कालावधीत जिल्ह्यातील एकूण प्राणघातक अपघातांपैकी 57 टक्के अपघात हे पुणे ग््राामीण क्षेत्रात झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दुचाकीस्वार आणि पादचारी व्यक्तींचा समावेश आहे. अहवालानुसार 2023 मध्ये पुणे ग््राामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात 983 जणांचे रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढले आहे.

अपघातात पादचारी, दुचाकीस्वारांचे मृत्यू

जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. अपघातांमध्ये दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भरधाव मोटार, ट्रकचालकांविरुद्ध कारवाईसाठी अशा प्रकारचे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वडगाव मावळ, लोणावळ्यात प्रायोगिक तत्त्वावर हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र, तसेच चित्रीकरण करू शकतात. तसेच, हेल्मेट न वापरणारे दुचाकीस्वार, वाहन चालविताना मोबाइलचा वापर अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे.
संदीपसिंह गिल्ल, पोलिस अधीक्षक, पुणे ग््राामीण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT