पुणे

पुणे : बोरीच्या साईनगरमध्ये बिबट्याची दहशत, संतप्त नागरिकांकडून मोर्चाचा इशारा

backup backup

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : बोरी (ता. जुन्नर) येथील साईनगरमध्ये गेल्या ६ महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. काही नागरिकांवर तसेच पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले झाले आहेत. या बिबट्याला पकडण्यासाठी ८ दिवसांपासून वनविभागाने पिंजरा लावला आहे, परंतु बिबट्या पिंजऱ्याजवळ येतोय, पिंजऱ्यातील भक्ष्य खाण्याचा प्रयत्नही करतोय, मात्र तो पिंजऱ्यात जात नाही. त्यामुळे या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे; अन्यथा वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

साईनगर परिसरामध्ये बिबट्याने पाळीव कुत्री व कोंबड्या फस्त केल्या आहेत. मागील आठवड्यामध्ये एका तरुणाचा बिबट्याने पाठलाग करून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या तरुणाने आरडाओरड केल्याने बिबट्या शेतात पळून गेला. दुसऱ्याच दिवशी एक तरुणीचाही बिबट्याने पाठलाग केला. तिनेही आरडाओरड केल्याने बिबट्या ऊसात पळाला. तिसऱ्या दिवशी आजोबा व नातीवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेतही दोघे बचावले.

या घटनांमुळे नागरिकांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधून वन विभागाकडून सहकार्य मिळत नाही, पिंजरा लावला जात नाही, अशी तक्रार केली. त्यानुसार खासदार कोल्हे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पिंजरा लावण्याची सूचना केली. वन विभागाने दोन पिंजरे परिसरामध्ये लावले. मात्र पिंजरे लावून आठवडा उलटला परंतु बिबट्या पिंजऱ्यात येईनासा झाला आहे. तो पिंजऱ्याच्या अवतीभोवती फिरत असून पिंजऱ्यातील भक्ष्य खाण्याचा प्रयत्नही करत आहे.

एक पिंजरा व्यवस्थित झाकला नसल्याने बिबट्या पिंजऱ्यात येत नसावा, तर दुसऱ्या पिंजऱ्यात भक्ष्य न ठेवल्यामुळे बिबट्या तिकडे फिरकत नाही, असे नागरिकांनी सांगितले. तर साईनगर परिसरामध्ये १५ ते २० बिबटे असावेत. आम्ही मुलांना शाळेत पाठवू शकत नाही. वन विभागाने बिबट्यांचा बंदाेबस्त करावा; अन्यथा वन विभागाच्या ओतूर कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

वन विभागाचे कर्मचारी दररोज घटनास्थळी जाऊन पिंजऱ्यामध्ये बिबट्याला भक्ष्य ठेवत आहेत. तसेच बिबट्या पिंजऱ्यामध्ये कशाप्रकारे जेरबंद होईल याबाबतची काळजीदेखील घेत आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. परिसरात बिबट्या दिसल्यास वन विभागाला तत्काळ कळवावे. तसेच सायंकाळच्या वेळेस कोणीही एकट्याने रस्त्याने अगर शेताच्या कडेला फिरू नये.
– वैभव काकडे, वनक्षेत्र अधिकारी, ओतूर

SCROLL FOR NEXT