पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया २५ मेपासून सुरू होत आहे. पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाकडे ३३३ सदस्यांचे भक्कम संख्याबळ असल्याने पुणे विधान परिषदेची जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेल्या सदस्यांची आकडेवारी पाहता, भाजपकडे निवडून आलेले स्वतःचे ३०९ सदस्य आहेत. त्यासोबतच दौंड येथील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे १७ सदस्य आणि इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’चे ७ सदस्यांचा भाजपला पाठिंबा असल्याचे आहे. त्यामुळे भाजपकडे एकूण ३३३ सदस्यांचे भक्कम संख्याबळ असल्याचा दावा करण्यात आला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळाला आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये पक्षाच्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. स्थानिक आघाड्यांनीही भाजपच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुणे विधान परिषद मतदारसंघाची जागा भाजपला मिळावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
पक्षाने संधी दिल्यास पूर्ण ताकदीने लढणार
पुणे महानगरपालिकेत गेली अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. पक्षाने तीन वेळा गटनेता म्हणून जबाबदारी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे मोठे संख्याबळ असून कार्यकर्त्यांची मजबूत ताकद आपल्या पाठीशी आहे. पक्षश्रेष्ठींनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत विजयासाठी प्रयत्न करू, असे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले.