पुणे: जमीन विक्रीच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम विलास चाकणकर (रा. गारमळा, धायरी) आणि अक्षय रमेश मोरे (रा. न्यू कोपरे, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी व्यावसायिक प्रवीण प्रतापराव जगताप (वय ५५, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
जगताप यांची कासुर्डी (ता. भोर) येथे जमीन आहे. मार्च २०२३ मध्ये चाकणकरसोबत या जमिनीचा आठ कोटी रुपयांत विक्रीचा व्यवहार ठरला होता. त्यानुसार चाकणकरने एक कोटी ८५ लाख रुपये, तर त्याचा मित्र सचिन सुर्वे याच्यामार्फत ५० लाख रुपये, असे एकूण दोन कोटी ३५ लाख रुपये जगताप यांना दिले. मात्र, २०२५ मध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याने हा व्यवहार रद्द करण्यात आला. त्यानंतर जगताप यांनी दोन कोटी ३५ लाख रुपये धनादेशाद्वारे (डी. डी.) परत केले तसेच व्यवहार रद्द झाल्याची जाहीर नोटीसही प्रसिद्ध केली.
दरम्यान, डिसेंबर २०२५ मध्ये अक्षय मोरेने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. चाकणकरने हीच जमीन जुलै २०२२ मध्ये २० लाख रुपयांना आपल्याला विकल्याचा दावा मोरेने केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, जगताप आणि चाकणकर यांची पहिली भेटच दि. १० मार्च २०२३ रोजी झाली होती. त्यामुळे त्यापूर्वी म्हणजेच दि. १६ जुलै २०२२ रोजी जमीन विक्री झाल्याचे दर्शविणारी कागदपत्रे बनावट असल्याचा संशय निर्माण झाला. याच आधारे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कात्रजच्या एक कोटी दरोड्याशीही संबंध
दरम्यान, विक्रम चाकणकरचे नाव कात्रज आणि नवले पुलाजवळ घडलेल्या एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रकरणातही समोर आले होते. दि. १८ जुलै २०२६ रोजी व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्या वाहनातील एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात चाकणकरसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खेड-शिवापूर पोलिस चौकीतील महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजीजजब्बार मेस्त्री यांचा दरोड्याच्या प्रकरणातील आरोपींना मदत आणि संरक्षण दिल्याचा आरोप तपासात समोर आला होता. नांदेड सिटी पोलिसांनी चाकणकर आणि मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रसाद राऊत पुढील तपास करीत आहेत.