Khed Kohinde Budruk borewell hot water
कडूस : खेड तालुक्यातील कोहिंडे बुद्रुक येथील मुराद सुलेमान मोमिन यांच्या कूपनलिकेमधून गेल्या १५ दिवसांपासून अक्षरशः उकळते पाणी येत आहे. गावकऱ्यांमध्ये या घटनेने आश्चर्य आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मुराद मोमिन यांनी सांगितले की, एक वर्षापूर्वी खणलेल्या या कूपनलिकेतून आतापर्यंत थंड पाणी येत होते; मात्र, अचानक १५ दिवसांपासून पाण्याचे तापमान वाढले असून, ते इतके गरम आहे की, बादलीत काढल्यानंतर त्यातून वाफा निघताना दिसत आहेत. कूपनलिकेतील पाणी इतके गरम आहे की, त्याचा वापर दैनंदिन कामांसाठी करणे अशक्य झाले आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भूगर्भातील बदलांबाबत चर्चा सुरू झाली आहे. काहींच्या मते, भूगर्भातील तापमानवाढ किंवा भू-औष्णिक बदल यामुळे असे घडत असावे. तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाला कळविण्यात आले आहे. भूगर्भशास्त्रज्ञांचे पथक लवकरच या ठिकाणी भेट देऊन पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करणार आहे.
या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले असून, काहींनी कूपनलिकेजवळ भेट देऊन पाण्याची पाहणी केली. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.