खेड कृषी उत्पन्न बाजार समिती 
पुणे

पुणे : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती!

पुढारी वृत्तसेवा

शिवनेरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचंड तापलेल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीला काही तास शिल्लक असतानाच सहकार विभागाने स्थगिती दिली. तालुक्यातील विरोधकांनी एकत्र येऊन आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचे दोन संचालक फोडून मोठा राजकीय डाव टाकण्याची योजना केली होती, परंतु थेट सहकार मंत्र्यांकडून निवडणुकीला स्थगिती मिळवत आमदारांनी विरोधकांवर कुरघोडी केल्याची चर्चा आता तालुक्यात चांगलीच रंगली आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख होतो. यामुळेच बाजार समिती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधक नेहमीच प्रयत्न करतात. सभापती कैलास लिंभोरे आणि उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी राजीनामे दिल्याने ही निवडणूक जाहीर झाली होती. दीड वर्षांपूर्वी बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक देखील प्रचंड चुरशीची झाली होती. त्यावेळी देखील आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या विरोधात तालुक्यातील सर्व गट एकत्र आले होते, पण आमदारांनी १८ पैकी तब्बल ११ संचालक आपल्या गटाचे निवडून आणून गड शाबूत ठेवला होता. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा तालुक्यातील सर्व गट एकत्र येत मोहिते-पाटील यांना सभापती पदाच्या निवडणुकीत खिंडीत पकडण्याचा डाव टाकला होता. आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचे दोन संचालक विरोधकांनी फोडून थेट परदेशात घेऊन गेले होते. संचालकांचा संपर्कच होऊ न शकल्याने आमदारांनी निवडणुकीच्या आदल्यादिवशी उच्च पातळीवर सर्व सुत्रे हलवत थेट सहकार मंत्री आणि उच्च न्यायालयात जात निवडणुकीला काही तास शिल्लक असतानाच स्थगिती मिळवली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT