पुणे: खराडी येथील इस्टर्न मिडोज सोसायटीमध्ये राहणाऱ्या ११ वर्षांच्या मुलाला सावत्र आई आणि वडिलांनी प्लास्टिक स्टंप व हाताने मारहाण करत चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १६ नोव्हेंबर सायंकाळी घडली. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात सावत्र आईसह वडीलांवर क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरावर्षीय मुलगा सोसायटीच्या गेटवर सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये रडत होता. सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ घुले यांना ही माहिती मिळाली; परंतु घुले हे बाहेर असल्यामुळे त्यांनी सोसायटीतील रहिवाशी आनंद शिंदे यांना संपर्क करून माहिती दिली.
शिंदे घरीच असल्यामुळे तत्काळ सोसायटीवर गेटवर गेले असता त्या ठिकाणी मुलगा रडत असल्याचे दिसून आले. शिंदे यांनी त्या मुलाची विचारपूस केली असता त्याने माझ्या आई-वडिलांनी मला लाटण्याने व प्लास्टिक स्टंप तसेच हाताने मारून घराबाहेर काढल्याचे सांगितले. त्यानंतर शिंदे यांनी चाइल्ड हेल्पलाइन व पोलिसांशी संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली.
थोड्याच वेळात पोलिस सदर ठिकाणी आल्यानंतर मुलाची विचारपूस केली. मुलाच्या मानेवर, छातीवर, हातावर, बरगडीखाली आणि पोटावर मारहाणीचे तसेच भाजल्याचे जखमेचे व्रण दिसून आले. त्याचे टी-शर्टही फाटलेले होते. यापूर्वीही सुमारे तीन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे मारहाणीची तक्रार सोसायटीतील सुरक्षा रक्षकांना मुलाने केली होती. त्यावेळी सोसायटीतील सदस्यांनी मुलाचे वडील आणि आई यांना समजावले होते. त्यावेळी त्यांनी मुलाला त्रास देणार नसल्याचे सांगितले.
मात्र त्याच्या आईने त्याला मारहाण केली. मारहाण करणारी महिला मुलाची सावत्र आई आहे. तिला तिच्या पहिल्या विवाहातून एक मुलगी आहे. किरकोळ कारणावरून ती वारंवार मुलाला मारहाण करत होती. घटनेची माहिती चाइल्ड हेल्पलाइन तसेच पोलिसांना कळवताच काही वेळातच पोलिस घटनास्थळी पोहोचले. चौकशीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा आई-वडिलांवर मुलाच्या वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल केला आहे.