Water Supply Pudhari
पुणे

Pune Water Shortage: कात्रज–कोंढवा परिसरात भीषण पाणीटंचाई; नागरिकांचे हाल

काही भागांत दोन-तीन दिवस पाणी नाही; टँकरवर अवलंबित्व वाढले, नागरिकांचा प्रशासनावर संताप

पुढारी वृत्तसेवा

कात्रज: कात्रज-कोंढवा रोड परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत दोन ते तीन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. परिसरातील नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

कात्रज, संतोषनगर, अंजनीनगर, आगम मंदिर, भारती विद्यापीठ परिसर, सुखसागरनगर, साईनगर, गोकुळनगर, टिळेकरनगर, येवलेवाडी, लक्ष्मीनगर, पानसरेनगर, गुजरनिंबळकरवाडी, मांगडेवाडी आणि भिलारेवाडी या भागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. मात्र, यावर लोकप्रतिनिधींनी मौन बाळगल्याने नाराजी व्यक्त होत आहे. किमान पिण्यासाठी तरी पाणी मिळेल का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रहिवासी विनय हुबळीकर म्हणाले की, अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे कात्रजच्या बहुतांश भागांत पाणी उपलब्ध नाही. बुधवारी (दि.22) सकाळी थोडा पाणीपुरवठा झाला होता. त्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारीही पाणी आले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

हॉटेल व्यावसायिक सदानंद पुजारी म्हणाले की, गॅस टंचाईमुळे आधीच अडचणी वाढल्या आहेत. त्यातच पाणीटंचाईमुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. गुरुवारी पाणी येणार नाही, याची कल्पना होती, पण शुक्रवारीही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे पुन्हा टँकर मागवावा लागला आणि अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

पाण्यामुळे अर्धा दिवस शाळा बंद

कात्रज येथील पाण्याच्या तीव टंचाईमुळे तातडीची सूचना देत अर्धा दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय एका खासगी शाळेने घेतला. पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने आणि टँकर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना दुपारी 12 वाजता घरी घेऊन जाण्याचे आवाहन शाळा प्रशासनाकडून पालकांना करण्यात आले.

गेली अनेक दिवस वेळी-अवेळी व कमी दबाने पाणी येण्याचे प्रमाण वाढले आहे. चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन केल्यास कोणताही प्रतिसाद मिळत नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तातडीने उपाययोजना करून आम्हाला दिलासा द्यावा.
कल्पना शहाणे, रहिवाशी
गुरुवारी क्लोजर असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. काही ठिकाणी कामे वेळेत न झाल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यास विलंब झाला आहे. तांत्रीक अडचणीचा विचार केल्यास पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागतो.
नितीन खुडे, उप अभियंता, पाणीपुरवठा विभाग महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT