पुणे

कसब्यात जोशींच्या विधानाने दिली भाजपला आयती संधी ; महाविकास आघाडी नैराश्यात असल्याची भाजपची टीका

नंदू लटके

पुणे : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पुण्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. दोन्ही मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा, रॅली, रॉड शो रोज सुरू आहेत. विशेषतः भाजपचा गड असलेल्या कसबा पेठ विधानसभेसाठी दोन्ही बाजूंनी मजबूत फिल्डिंग लावण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्या एका व्हिडिओने भाजपला टीकेचे चांगलीच संधी उपलब्ध करून दिली आहे. या व्हिडिओच्या अनुषंगाने महाविकास आघाडी कसबा मतदारसंघात पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जाते.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, "कसब्यातील एकूण २७० बुथपैकी १३० बुथवर काँग्रेसची स्थिती अत्यंत वाईट आहे, तसेच ७० बुथवर काँग्रेसला मध्यम प्रतिसाद आहे, असे मोहन जोशी सांगत असल्याचे या व्हिडिओतून दिसते. हा एक प्रकारे महाविकास आघाडीसाठी घरचा आहेरच आहे. अशा विधानांमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांत निराशेचे वातावरण पसरले तर त्यात नवल नाही."

उपाध्ये म्हणाले, "भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष यांची मजबुत अशी एकजूट आहे. त्यामुळे भाजपचा विजय हा निश्चित आहे. महाविकास आघाडी विस्कळित आहे, हेच जोशी यांच्या विधानातून दिसते. काँग्रेसची सगळी ताकद महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना एकत्र ठेवण्यातच खर्ची पडत असेल, तर निवडणुकीच्या तयारीकडे दुलर्क्षच होणार. मनोधैर्य खचलेल्या काँग्रेसचा निवडणुकीत पराभव निश्चित आहे."

या बैठकीत पाटील आणि थोरात यांनी कार्यकर्त्यांची कानउघाडणी केल्याचीही चर्चा रंगली आहे. जोशी यांचे वक्तव्य म्हणजे कसबा भाजपचाच असल्याचे मान्य केल्या सारखे आहे, आणि याचे प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालात दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्षच अधिकृत शिवसेना ठरल्याने महाविकास आघाडीत नैराश्य आहेच. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे पारडे नक्कीच जड आहे, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT