पुणे

Pune Crime : जुन्नरमध्ये ३ किलो गांजा, कार आणि स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

एक जण ताब्यात : दोन आरोपी फरार

पुढारी वृत्तसेवा

लेण्याद्री : जुन्नर शहरातील बंद स्थितीतील अहिल्यादेवी होळकर शाळा क्रमांक ४ च्या परिसरात रात्र गस्तीदरम्यान जुन्नर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ३ किलो गांजा, एक कार, एक स्कूटर असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १८) रात्री पोलीस हवालदार हांडे, पोलीस शिपाई बापू वाघमोडे आणि पोलीस शिपाई अमोल सातपुते हे नियमित रात्रगस्त करत होते. यावेळी अहिल्यादेवी होळकर शाळा क्रमांक ४ च्या मैदानात एक चारचाकी व एक दुचाकी संशयास्पदरीत्या उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय बळावल्याने त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यातून अतिरिक्त मदत मागवली.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे, पोलीस हवालदार महेश भालेराव तसेच पोलीस शिपाई दादा पावडे, कैलास केंद्रे, शंभू निरडे आणि अजय इंगोले यांचे विशेष पथक घटनास्थळी रवाना झाले.

पथकाने छापा टाकून आरोपी मयूर संजय खराडे याच्या ताब्यातील इनोव्हा (एमएच १२ इटी ३९११) ची झडती घेतली असता त्यामध्ये २.०६६ किलो गांजा आढळून आला. तसेच घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपींच्या दुचाकीतून ०.९६२ किलो गांजा जप्त करण्यात आला. अशाप्रकारे एकूण ३.०२८ किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला.

प्राथमिक तपासात आरोपी हे अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत एक आरोपी अटकेत असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, फरार असलेल्या दोन्ही आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दत्तात्रय गुंड आणि जुन्नर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई यशस्वी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT