पुणे: पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 या प्रतिष्ठेच्या सायकल स्पर्धेसाठी रस्त्यांच्या दुरुस्ती व सुधारणा कामांवर तब्बल 145 कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र, या कामांसाठी पात्रतेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या दोन ठेकेदारांना महापालिकेच्या पथ विभागाने पात्र ठरवल्याचा गंभीर आरोप ‘आपला पुणे परिसर’ संस्थेने केला आहे.
स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील 75 किलोमीटर मार्गावरील डांबरीकरण, चेंबरदुरुस्ती, पादचारी मार्गदुरुस्ती आदी कामांसाठी 145 कोटी 75 लाख 80 हजार रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. यासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. (Latest Pune News)
नियमांनुसार काम करणाऱ्या ठेकेदाराकडे स्वतःच्या मालकीचा स्कॉडा ऑटोमेटेड बॅच मिक्स प्लांट असणे बंधनकारक होते. मात्र, दोन ठेकेदारांकडे स्वतःचा प्लांट नसल्याने त्यांनी इतर प्लांटबरोबरचे करारनामे जोडले.
त्यामुळे अटी-शर्तीनुसार त्यांना अपात्र ठरविले पाहिजे होते; परंतु पथ विभागाने त्यांना पात्र घोषित केले, असा आरोप संस्थेचे पदाधिकारी उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेल्या निवेदनात केला.
संस्थेने पुढे म्हटले आहे की, ‘एका पॅकेजमध्ये पात्र ठरविलेल्या ठेकेदाराला दुसऱ्या पॅकेजमध्ये अपात्र ठरविले गेले, हे अधिकच संशयास्पद आहे. पुणेकरांच्या कररूपी पैशांचा वापर ‘टूर’च्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने होऊ नये, यासाठी आम्ही आवाज उठवत आहोत. तसेच, सर्व कागदपत्रे पारदर्शकतेसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणीही संस्थेने केली आहे.
आरोपात तथ्य नाही: पावसकर
पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, शहरातील विविध रस्त्यांच्या 145 कोटींच्या कामांसाठी निविदा भरलेल्या ठेकेदारांकडे स्वतःच्या मालकीचे स्कॉडा ऑटोमेटेड बॅच मिक्स प्लांट आहेत. त्यामुळे अपात्र ठेकेदारांना पात्र ठरविले, या आरोपात तथ्य नाही.