पुणे

Pune : रमजान ईद उत्साहात; शुभेच्छांसाठी राजकीय पक्षांची चढाओढ

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सामूहिक नमाजपठणात सहभागी झालेले हजारो मुस्लिम बांधव… घरोघरी बिर्याणीसह शीरकुर्माचा सहकुटुंब घेतलेला आस्वाद… 'ईद मुबारक' म्हणत एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा आणि उत्साहात, आनंदात गुरुवारी (दि.11) ईद ऊल फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्यात आली. घरोघरी ईदनिमित्त हर्षोल्हासाचे वातावरण पाहायला मिळाले. मशिदींमध्ये सकाळी सामूहिक नमाजपठणाचे आयोजन केले होते, ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा केली. देशात सुख, समाधान, शांतता नांदो आणि देशात भाईचारा नांदो, अशी दुवाँ करत बांधवांनी रमजान ईदच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

कोंढवा, कॅम्प, कोरेगाव पार्क, खडकी, औंध, बोपोडी आदी ठिकाणी नवीन कपडे परिधान करीत एकमेकांना शुभेच्छा देणारे बांधव पाहायला मिळाले. घरोघरीही ईदच्या निमित्ताने मोठ्यांनी छोट्यांना ईदी दिली. विविध संस्था-संघटनांतर्फे सामाजिक उपक्रमही आयोजिले होते. तसेच, सोशल मीडियाद्वारेही एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सकाळपासून घरोघरी ईदचा उत्साह पाहायला मिळाला. बिर्याणीसह विविध खाद्यपदार्थ तयार करण्यात आले. घरोघरी सायंकाळपर्यंत ईदचा आनंद कायम होता. पुणे-सोलापूर रस्त्यावरील ईदगाह मैदान येथे रमजान ईदनिमित्ताने सामूहिक नमाज अदा करण्यात आली. मौलाना निजामुद्दीन फकरुद्दीन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी याप्रसंगी मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देऊन 'ईद मुबारक'च्या शुभेच्छा दिल्या.

ईदगाह मैदान ट्रस्ट, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, पुणे महापालिका, लष्कर पोलिस ठाणेतर्फे मुस्लिम बांधवांचे स्वागत करण्यात आले. ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष जैनूल काझी, ताहेर आसी, मुश्ताक पटेल आदींनी उत्साहाने समाजबांधवांचे स्वागत केले. दरम्यान, शहरातील विविध मशिदींमध्येदेखील सामूहिक नमाज अदा करण्यात आली. घरोघरी पाहुण्यांसाठी खास शिरकुर्म्याचा बेत ईदच्या निमित्ताने करण्यात आला होता. गरजूंनादेखील यानिमित्ताने मदत करण्यात आली.

शुभेच्छांसाठी राजकीय पक्षांची चढाओढ

लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे काही राजकीय पक्षांचे उमेदवार आणि नेत्यांनी ईदगाह मैदान येथे भेट देत मुस्लिम समाजबांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. अनेक उमेदवारांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. निवडणूक जवळ आल्याने मतदारांशी संपर्कासाठीची राजकीय पक्षांची चढाओढ या वेळी पाहायला मिळाली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT