पुणे

Pune Illegal Abortion Cases : गर्भलिंग निदान करणारे अटकेत; मग गर्भपात करणारे कोण?

दौंड तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, गर्भलिंगनिदान आणि गर्भपात प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

केडगाव : दौंड तालुक्यातील गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवून दिली असताना या संपूर्ण साखळीतील आणखी एक गंभीर प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे. गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटमधील काही एजंट आणि संबंधित व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करून त्यांना गजाआड केले असले, तरी गर्भलिंग निदानानंतर होणारे गर्भपात नेमके कुठे आणि कोणाकडून केले जात होते, याचा शोध अद्यापही लागायचा आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या विविध माहितीनुसार अनेक वर्षे गर्भलिंग निदानाचे जाळे कार्यरत असल्याची चर्चा आहे. जर मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान चाचण्या झाल्या असतील, तर त्यानंतरच्या गर्भपातांची नोंद, त्यामागील वैद्यकीय साखळी आणि संबंधित व्यक्तींची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे

गर्भलिंग निदानाच्या बेकायदेशीर प्रकारानंतर काही ठरावीक ठिकाणी गर्भपात केले जात असल्याची शंका अनेक वर्षांपासून व्यक्त होत होती; मात्र यासंदर्भात ठोस तपास आणि कारवाई झाल्याचे अद्यापही दिसून आले नाही. त्यामुळे या संपूर्ण साखळीतील महत्त्वाचा दुवा अद्यापही तपासाच्या कक्षेबाहेर आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जर अनेक वर्षे हे रॅकेट सक्रिय होते, तर या कालावधीत झालेल्या गर्भलिंग निदान चाचण्यांची संख्या मोठी असू शकते. अशा परिस्थितीत त्यानंतर झालेल्या गर्भपातांची चौकशी करणे, वैद्यकीय नोंदी तपासणे, संशयास्पद व्यवहारांची पडताळणी करणे आणि संबंधित केंद्रांची छाननी करणे ही यंत्रणांसमोरील मोठी जबाबदारी आहे.

या प्रकरणात केवळ एजंट किंवा मध्यस्थांवर कारवाई करून तपास पूर्ण होणार नसून संपूर्ण साखळी उघडकीस आणणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गर्भलिंग निदानापासून गर्भपातापर्यंतचा प्रवास नेमका कसा घडत होता, याचा उलगडा होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात ही केवळ कायदेशीर नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही गंभीर बाब आहे. मुलींच्या जन्मदरावर परिणाम करणाऱ्या अशा प्रकारांमुळे समाजात असंतुलन निर्माण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

सध्या या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण दौंड तालुक्यासह राज्याचे लक्ष लागले असून, पोलिस आणि आरोग्य विभागाने या साखळीतील प्रत्येक दुव्याचा शोध घेऊन सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्यानंतरचे बेकायदेशीर प्रकार करणारे कोण, याचे उत्तरही जनतेला मिळाले पाहिजे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

गर्भपात प्रकरणात तपासी अधिकारी बदला

दोन दिवसांपूर्वी केडगावमधील एक डॉक्टर आणि उरुळी कांचनमधील एका डॉक्टरवर बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास केडगावमधील अधिकाऱ्यांच्याकडे देण्यात आला आहे. गर्भपात प्रकरणी आणखी धक्कादायक माहिती यामध्ये उघड होऊ शकतो. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास स्थानिक अधिकाऱ्याकडे न देता यापूर्वी गर्भलिंग निदान चाचणीमधील गुन्ह्याच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र पथकाकडे देणे गरजेचे आहे. स्थानिक अधिकारी तपास करत असल्यास आर्थिक तडजोडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तपासात मर्यादा होऊ शकतात, अशी चर्चा केडगाव परिसरात आहे.

संबंधित यंत्रणेबाबत नागरिकांमध्ये संताप

या प्रकरणामुळे तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वैद्यकीय केंद्रांची नियमित तपासणी, नोंदींची पडताळणी, गर्भपातासंदर्भातील कायदेशीर प्रक्रियेचे पालन आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर प्रकार घडत राहिले कसे, याबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT