पुणे: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची कुऱ्हाडीने अत्यंत क्रूरपणे हत्या करत तिचे मुंडके घेऊन रामचंद्र शेहू चव्हाण (वय 74, रा. गंगा ओशियन पार्क सोसायटीसमोर, भारती विद्यापीठ परिसर) यास पुणे सत्र न्यायालयाने जन्मठेप तसेच, 5 हजार रुपये दंड ठोठावला.
दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा देण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील जोशी यांनी हा निकाल दिला. सोनाबाई रामचंद्र चव्हाण (वय 55) यांची हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.
या प्रकरणात, चव्हाण याला अटक करीत त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी एकूण 24 साक्षीदार तपासले. यामध्ये आरोपीच्या सुनेची साक्ष महत्त्वाची ठरली. मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या तिने डोळ्यांदेखत आपल्या सासूवर झालेला हल्ला पाहिला होता. मयताचे रक्त तिच्या कपड्यांवरही उडाले होते.
जपानमधून व्हिसीद्वारे नोंदविली साक्ष
रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने आरोपी कापलेले मुंडके घेऊन जात असतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. विशेष म्हणजे, हा साक्षीदार नोकरीनिमित्त जपानमध्ये असतानाही न्यायालयाने त्याची साक्ष नोंदवून घेतली. तसेच, एका 5 वर्षांच्या चिमुरडीनेही ‘अण्णा’ (आरोपी) ला ओळखले.
‘बायकोला मारले’ कबुली जबाब न्यायालयात सिद्ध
घटनेनंतर आरोपी एका हातात मुंडके व दुसऱ्या हातात कुऱ्हाड घेऊन चालला होता. त्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेने आरोपीला विचारले की ‘अण्णा कुठे बकरू कापले?’ त्या वेळी म्हणाला, ‘बायकोला मारले.’ आरोपीने महिलेला दिलेला कबुलीजबाब सरकारी पक्षाने न्यायालयात सिद्ध केला.