पिंपरी : हिंजवडी येथील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टॅम्पो ट्रॅव्हलर वाहनाने अचानक पेट घेतल्याने झालेल्या भीषण अपघातात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर भाजले. मात्र, या घटनेमागे आता एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. ही आग अपघाताने नव्हे, तर चालकाने हेतुपुरस्सर लावण्यात आली आहे.
पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर येत असून, गाडीचा चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच दिवाळीत बोनस तसेच पगार न दिल्याच्या रागातून ही आग लावल्याचे सामोर आले आहे. कंपनीतील काही सहकाऱ्यांशी त्याचा पूर्वीपासून वाद सुरू होता. त्यामुळेच, सूडबुद्धीने हा कट रचण्यात आल्याची शक्यता पोलिस तपासातून पुढे येत आहे.
बेंझिन केमिकल गाडीच्या खाली ठेवण्यात आले होते, जे अत्यंत ज्वलनशील असते. आग लवकर लागावी म्हणून चिंद्या ठेवण्यात आल्या होत्या. नियोजनानुसार, गाडी पेटवण्यात आली आणि त्याला अपघाताचा रंग देण्याचा प्रयत्न झाला.
या घटनेत हंबर्डीकरचा कंपनीतील तिघांशी वाद होता, मात्र ते बचावले. मात्र, शंकर शिंदे, गुरुदास लोखरे, सुभाष भोसले आणि राजन चव्हाण यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. या धक्कादायक खुलाशानंतर हिंजवडी औद्योगिक क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.