पुणे: शहरात उन्हाचा तडाखा चांगलाच जणावू लागला आहे. कोरेगाव पार्क आणि लोहगाव हे भाग उष्णतेचे हॉटस्पॉट बनले आहेत. तेथील पारा दोन दिवसांपासून 39 अंशांवर गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
यंदा शहरात उष्णतेचा कहर मागच्या वर्षीच्या तुलनेत उशिरा सुरू झाला आहे. गतवर्षी फेबुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच शहरात उष्मा जाणवत होता. मात्र, यंदा 3 मार्चपर्यंत शहराचे कमाल तापमान 32 ते 33 अंशांवर होते. परंतु 5 मार्चपासून पाऱ्याने अचानक उसळी घेतली अन् तापमान 35 ते 36 अंशांवर गेले. 8 मार्च रोजी कोरेगाव पार्क आणि लोहगावचे तापमान यंदा प्रथमच 39 अंशांवर पोहोचले.
शहरातील उर्वरित भागाचे तापमान 36 ते 38 अंशांवर असले तरी वाऱ्याचा वेग कमी झाल्याने उष्मा जास्त जाणवत आहे. त्यात शहरातील प्रदूषित हवेची मोठी भर पडत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते कोरेगाव पार्क आणि लोहगाव हे भाग उष्णतेची बेटं झाली आहेत. कारण अतिनागरीकरण, सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल आणि उंच इमारतींमुळे या भागात शहरातील इतर भागापेक्षा तापमान 2 ते 3 अंशांनी जास्त जाणवते आहे.
सोमवारचे कमाल तापमान
कोरेगाव पार्क 39, लोहगाव 39, शिवाजीनगर 37, पाषाण 36, चिंचवड 37, लवळे 36, मगरपट्टा 36, एनडीए 36.