Hawkers Pudhari
पुणे

Pune Hawkers Committee: पुणे फेरीवाला समितीची बैठक पुन्हा रद्द; प्रलंबित प्रश्नांवर निर्णय रखडला

पुनर्वसन, परवाने आणि फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला विलंब; सदस्यांचा महापालिका प्रशासनावर संताप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या फेरीवाला समितीची आज बुधवारी (दि. ५) होणारी नियोजित बैठक ऐनवेळी दुसऱ्यांदा रद्द केल्याने समितीच्या सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. फेरीवाला धोरणानुसार समितीची बैठक किमान तीन महिन्यांतून एकदा घेणे बंधनकारक असतानाही वारंवार बैठका पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यास पुन्हा विलंब होणार आहे.

शहरातील फेरीवाल्यांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होऊन निर्णय अपेक्षित होता. मात्र, बैठक रद्द झाल्याने पुनर्वसन, परवाने, कायदेशीर बाबी तसेच इतर प्रलंबित विषय पुन्हा लांबणीवर पडले आहेत. परिणामी, फेरीवाल्यांना न्याय मिळण्यास आणखी विलंब होणार असल्याची खंत सदस्यांनी व्यक्त केली.

समितीच्या सदस्यांनी महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नियमितपणे बैठका न घेणे किंवा त्या ऐनवेळी रद्द करणे, ही निष्काळजी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. फेरीवाल्यांच्या न्याय्य मागण्या, पुनर्वसन, परवाना प्रक्रिया तसेच अन्य कायदेशीर प्रश्नांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का? असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला आहे.

फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समितीच्या बैठका नियोजित वेळेत घेणे आवश्यक आहे. तसेच, प्रलंबित विषयांवर तातडीने निर्णय घेऊन फेरीवाल्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी समितीच्या सदस्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT