पुणे

Pune Hanuman Jayanti : धागंवडीत रंगला अडबलसिद्धनाथांचा गाडेबगाड सोहळा

हनुमान जयंतीनिमित्त ढोल-ताशांच्या निनादात पारंपरिक उत्सव; भाविकांची मोठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

सारोळा : भोर तालुक्यातील धागंवडी येथे गुरुवारी (दि. २) पांडवकालीन श्री अडबलसिद्धनाथ गाडेबगाड यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. चैत्र शुक्ल पक्ष पौर्णिमा अर्थात हनुमान जयंतीनिमित्त होणाऱ्या या उत्सवासाठी पुणे, सातारा, धाराशिव जिल्ह्यांसह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

दुपारी साडेचार वाजता निगडे गावातील म्हखाळेदेवीची पालखी धागंवडी येथे आगमन झाल्यानंतर गाडेबगाड सोहळ्याला सुरुवात झाली. ढोल-ताशे, ब्याडबाजा आणि फटाक्यांच्या आतषबाजीच्या गजरात गाडेबगाड गावातून निघाला.

१२ बैलांच्या सहाय्याने दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री अडबलसिद्धनाथ मंदिरापर्यंत गाडेबगाड ओढत नेण्यात आला. यावेळी गाडेबगाडावरील दोन मानकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने फिरवत मंदिरात नेऊन दर्शन घडविण्यात आले.

दरम्यान, पुणे-सातारा महामार्गावरून गाडेबगाड मंदिराकडे जात असताना राजगड पोलीस व सारोळा महामार्ग वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवत नियोजन केले. काही काळ वाहतूक थांबविण्यात आल्याने प्रवाशांनीही गाडेबगाड सोहळ्याचे दर्शन घेतले.

या सोहळ्यास पंचक्रोशीतील मान्यवर, ग्रामस्थ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक उत्साह, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपत धागंवडीतील हा गाडेबगाड उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला.

धांगवडी येथील श्री अडबलसिद्धनाथ हे प्राचीन व जागृत देवस्थान मानले जाते. भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा असल्याने दर रविवारी तसेच यात्रोत्सवाच्या काळात येथे मोठी गर्दी होत असल्याची माहिती पुजारी गोविंद मांडके यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT