पुणे

पुणे : मामा-भाच्यांनी लपवलेला गुटखा; टेम्पोसह ७३ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला

backup backup

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा : राजगड पोलिसांच्या हद्दीत गुटखा पकडण्याची मालिकाच सुरु असून मामा-भाच्यांनी विक्री करणेसाठी आणलेला ५६ लाखाचा गुटखा टेम्पोसह स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून एकूण ७३ लाख ८५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. आडबाजूला लपवलेला टेम्पो क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. कारवाईतील मुद्देमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने राजगड पोलीस मात्र हैराण झाले आहे.

सुधाकर कल्याण पानसरे, दिनेश कल्याण पानसरे दोघेही (रा. शिवरे, ता. भोर) आणि ऋत्विक दशरथ मोरे (वय २४, रा. मोरवाडी, ता. भोर) अशी मामा-भाच्यांची नावे असून मुख्य सूत्रधार नजीम (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋत्विक मोरे याला जागेवरच ताब्यात घेण्यात आले असून इतर फरारी आरोपींचे शोध सुरु आहे.

शनिवारी ( दि. २४) मोरवाडी (ता. भोर) वनविभागाच्या हद्दीत गुटख्याने भरलेला टेम्पो (एमएच ०७ एजे २९४३) हा आडजागेत लपवलेल्या ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करीत पकडला आहे. शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोरवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत टेम्पोमध्ये गुटखा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता ताडपत्रीने झाकलेला आयशर कंपनीचा टेम्पोजवळ ऋत्विक मोरे हा संशयित हालचाल करत उभा असताना मिळून आला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता उग्र गुटख्याचा वास आला. गुटख्याचा माल हा सुधाकर पानसरे व दिनेश पानसरे यांचा असून माल हा पुढे नजीम नावाचे व्यक्तीला पुणे येथे विक्री करणेसाठी घेवून जाणार असल्याची कबुली ऋत्विकने दिली. टेम्पो, १२० सुतळी पोती, १५ मोठे बॉक्स, दोन बनावट नंबर प्लेट, मोबाईल असा एकूण ७३, लाख ८५ हजार ४०० मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक हनुमंत पासलकर, प्रमोद नवले पोलीस हवालदार महेश बनकर, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, अजय घुले, राजगड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, सहायक उपनिरीक्षक कृष्णा कदम, नाईक नाना मदने, मयुर निंबाळकर, गणेश लडकत, योगेश राजीवडे यांनी यशस्वी कारवाई केली. सहायक उपनिरीक्षक हनुमंत पासलकर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT