पुणे: दिवाळी संपल्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यातही घरगुती ग्राहकांसह किराणा व्यावसायिकांकडून खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मालाचा उठाव मंदावला आहे. विशेषतः साखर आणि गुळाच्या मागणीत घट झाल्याने मागील पंधरा दिवसांत साखरेच्या भावात किलोमागे दोन रुपयांची घसरण झाली आहे. तर, नवीन हंगामातील तांदळाची आवक सुरू झाल्याने कोलम तांदूळही किलोमागे दोन ते तीन रुपयांनी स्वस्त झाला आहे. उर्वरित बहुतांश जीवनावश्यक वस्तूंचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दिवाळीपूर्वी फराळाचे पदार्थ, मिठाई तसेच घरगुती वापरासाठी साखर, गूळ, खाद्यतेल आणि अन्य किराणा मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली होती. मात्र, सणानंतर ग्राहकांकडून खरेदीचे प्रमाण घटले आहे. किराणा व्यावसायिकांकडूनही गरजेपुरतीच खरेदी होत असल्याने बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे.
साखरेच्या मागणीत घट झाल्याने दरात घसरण होऊन प्रतिक्विंटल भाव ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपयांवर आले आहेत. तर, गुळाचे भाव प्रतिक्विंटल ४ हजार ६०० ते ५ हजार ५०० रुपयांदरम्यान टिकून आहेत. दरम्यान, तांदळाचा नवीन हंगाम सुरू झाल्याने बाजारात नवीन माल दाखल होऊ लागला आहे. परिणामी, कोलम तांदळाच्या भावात किलोमागे दोन ते तीन रुपयांची घट झाली आहे.
सध्या एचएमटी कोलम तांदळाला प्रतिक्विंटल ७ हजार ते ७ हजार ४०० रुपये, तर लचकारी कोलमला ८ हजार ते ८ हजार ४०० रुपये भाव मिळत आहे. बासमतीसह अन्य तांदळाचे दर स्थिर आहेत. गव्हामध्ये लोकवनला प्रतिक्विंटल ३ हजार ७०० ते ५ हजार रुपये, गावरान ज्वारीला ६ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये, तर बाजरीला ३ हजार २०० ते ४ हजार २०० रुपये भाव मिळत आहे.
खाद्यतेल आणि डाळींच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. याखेरीज साबुदाणा, भगर, गोटा खोबरे, शेंगदाणे, रवा, आटा, मैदा, पोहे, लाल मिरची आणि नारळाचे भावही मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मागणी आणि पुरवठ्यातील समतोलामुळे बहुतांश वस्तूंच्या दरात बदल झाला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.