पुणे: दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी आटोपल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात ग्राहकांची वर्दळ ओसरली आहे. परिणामी, साखर, गूळ, खाद्यतेलासह विविध किराणा मालाच्या मागणीत घट झाली आहे.
मागणी रोडावल्याने साखरेच्या दरात किलोमागे एक रुपयाची घसरण झाली आहे. दुसरीकडे, पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम डाळींच्या दरावर होत असून, तूरडाळ आणि हरभराडाळ किलोमागे तीन ते चार रुपयांनी महागली आहे. उर्वरित बहुतांश किराणा मालाचे दर मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी फराळासाठी लागणारे साहित्य, साखर, गूळ, रवा, मैदा, बेसन आणि खाद्यतेलाची खरेदी यापूर्वीच केली आहे. त्यामुळे सध्या भुसार बाजारातील खरेदीचा जोर ओसरला आहे. विशेषतः साखरेच्या मागणीत घट झाल्याने किलोमागे एक रुपयाने दर कमी झाले असून, घाऊक बाजारात साखरेला प्रतिक्विंटल ५ हजार ४०० ते ५ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. गुळाची मागणीही कमी झाली असली, तरी दर स्थिर आहेत.