पुणे

Pune Graduate and Teachers Constituency Election : भैया माने, मंगेश चिवटे यांची माघार

पुणे पदवीधरमध्ये ४७, शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारीची मुदत शुक्रवारी (दि. ९) संपली. त्यानंतर दोन्ही मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले. पदवीधर मतदारसंघातून ४७, तर शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप ऊर्फ भैया माने यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून २१ तर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून १८ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. या माघारीमुळे दोन्ही मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.

पदवीधरमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी

पदवीधर मतदारसंघात भाजपकडून डॉ. स्मिता जाधव तर महाविकास आघाडीकडून हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे नेते प्रताप ऊर्फ भैया माने यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, महायुतीतील मतविभाजन टाळण्यासाठी त्यांनी शुक्रवारी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे प्रमुख उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ६९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २२ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ४७ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघात ७८१ मतदान केंद्रे असून एकूण ३ लाख ८८ हजार १९ मतदार आहेत.

शिक्षक मतदारसंघात १८ जणांची माघार

शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते मंगेश चिवटे यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र, पक्षीय पातळीवरील चर्चेनंतर त्यांनी माघार घेतली.

शिक्षक मतदारसंघासाठी ४८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी १८ जणांनी माघार घेतल्याने आता ३० उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात ३१० मतदान केंद्रे असून सुमारे ६२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्याने आता प्रचाराला वेग येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT